कालच एका वृत्तवाहिनीवर मुघल ‘औरंगजेब गुरकनी’च्या आयुष्यावर चित्रपट येत असल्याची बातमी वाचली.

प्रश्न पडला – का ?

पण मागच्या काही वर्षांपासून मनोरंजनसृष्टीचा प्रवास पाहता त्यात वेगळं असं काही वाटलं नाही!

पण हे असं वेगळं न वाटणं हीच धोक्याची घंटा आहे!

एकूणच मागच्या काही वर्षांपासून चित्रपट, मालिका, वार्तांकन वाहिन्या हे जनतेला गृहीत धरल्यासारखे वागू लागले आहेत. चित्रपट, मालिका कोणावर बनवावेत, कोणावर बनवू नये ह्याचा काही पायपोसच उरला नाही.

दोन वर्षांपुर्वी एका अतिकुख्यात गुन्हेगाराच्या बहिणीवर चित्रपट येऊन गेला, त्या चित्रपटाच्या शीर्षकात तिला ‘मुंबईची राणी’ वैगेरे अशी अतिशयोक्तीपुर्ण विशेषणं चिकटवली गेली. ह्यात त्या चित्रपटाच्या निर्मात्याचं असं म्हणणं होतं की ह्या बाईने काही विशिष्ट लोकांना मदत केली. मुळातच ह्यांची खुप मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी. त्यात त्या क्षेत्रातील संबंधित लोकांना आणि बाकी काही मोजक्यांना ह्यांनी आपला दबदबा निर्माण करण्यासाठी मदत केली तर मग असा कुठला आदर्श ठेवला समाजासमोर की त्यांच्या जीवनावर चित्रपट काढले जावेत? आणि वरून ह्या लोकांच्या नावांना अशी विशेषणं चिकटवून त्यांना उगाच नको तिथं मोठं दाखवण्याचा घाट का? त्यांची ‘अस्तित्वात नसलेली चांगली बाजू’ चित्रपटात विनाकारण दाखवून पैसे कमावण्याचा अट्टाहास का?

मुळात समाजामध्ये भूतकाळात आणि वर्तमानकाळात एवढे चांगले आदर्श असताना नको त्या लोकांवर चित्रपट काढायचा कर्मदरिद्रीपणा सुचतोच कसा? विविध क्षेत्रातील आदर्श, जसे अब्दुल कलाम, होमी भाभा, विजय साळसकर इ.च्या जीवनावर चित्रपट का नाही निघत? ताररहित संभाषण (Wireless communication) चे जनक, ज्यांच्या रेडिओ व्हेव्जवरील शोधाने जगातील पहिला रेडिओ बनवण्यात यश आले, वनस्पतींना असणाऱ्या जाणिवा इ. सारखे अनेक शोध लावणारे महान शास्त्रज्ञ ‘जगदीशचंद्र बोस’, भारताचा पहिला सुपरकाँम्प्यूटर बनवणारे ‘विजय भटकर’, अश्या व्यक्तिमत्वांवर चित्रपट का नाही निघू शकत?

आमच्या देशात एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात वेगवेगळे चटपटीत प्रसंग आहेत, किंवा तो एखाद्या विशिष्ट भागातील आहे म्हणून त्याच्या जीवनावर चित्रपट निघू शकतो, पण अश्या कुठल्याही खेळाडूपेक्षा अनेक पटींनी मोठे कर्तृत्व असणाऱ्या,स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या (जी कामगिरी परत करायला भारताला त्यानंतर ४४ वर्षं लागली) अशा ‘खाशाबा जाधव’ ह्यांच्यावर चित्रपट निघू नाही शकत? वर उल्लेख केल्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराच्या बहिणीवर चित्रपट निघू शकतो, पण भारताला पहिले महिला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या ‘कर्णाम मल्लेश्वरी’ ह्यांच्यावर चित्रपट नाही निघू शकत!

वर्षानुवर्ष सत्ताधाऱ्यांशी साटलोट ठेवून अनेक फायदे उकळणाऱ्या उद्योगपतींवर चित्रपट निघू शकतात, पण भारतात उद्योगक्षेत्राचा पाया रचणाऱ्या उद्योगपतीवर किंवा उद्योगक्षेत्रात विविध आदर्श असे पायंडे पडणाऱ्या उद्योगपतीवर चित्रपट नाही निघू शकत !

मालिकाविश्वाचं ही काही वेगळं नाही. आधी उत्तम विषय घेऊन येणाऱ्या ह्या क्षेत्रावर ‘एकता कपूर’ छाप मालिकांचा प्रभाव आणि त्याचा विविध भाषांमध्ये प्रसार ह्यामुळे सगळीकडे आनंदीआनंदच आहे.

एवढ्या पसाऱ्यात ‘मराठी मनोरंजनसृष्टी’ किंवा ‘बंगाली मनोरंजनसृष्टी’ अश्या काही मोजक्याच ठिकाणी ‘बहुतांशी’ अर्थपुर्ण विषयांवर काम होत असताना दिसतं.  पण ही एकतर प्रादेशिक ठिकाणांची मनोरंजन क्षेत्र आहेत आणि लोकांना लागलेली मसालेदार गोष्टींची चटक ह्यामुळे एकूणच चांगले विषय सर्वदूर पोहोचण्यात अडचणी येतात.

ओटीटी प्लॅटफाॅर्मवर नवीन विषय हाताळले जाताना दिसतात. पण तिथेही मोठ्या प्रमाणात अर्वाच्य भाषा, अडल्ट सीन यांचा कारण नसताना भडिमार दिसतो. ह्या गोष्टी दाखवत असताना व्यक्तीचे वय,पद इ. गोष्टींचा अजिबातच विचार केला जात नाही. इथे कालानुपरत्वे विचार बदलण्याचे दाखले दिले जातात. सकारात्मक, प्रेरणादायी बदलांचं स्वागत व्हायलाच हवं, पण बहुतांशी वेळी कथानकाशी संबंध नसताना उगाच नको त्या गोष्टींचा मसाला टाकला जातो.

प्रसारमाध्यम/वार्तांकन करणाऱ्या वाहिन्या ह्यांचापण बऱ्याचदा सवंगपणाकडे जास्त भर असतो. भौतिकरूपाने जास्त काही उत्पादक मूल्य नाही, उलट तोटाच जास्त आहे अश्या गोष्टी – जसं मोबाईल कंपनीच्या प्लॅन्सच्या फुकटच्या जाहिराती – मध्ये तासनतास घालवलेले दिसतात. पण एखादी BVG सारखी शेतकऱ्यांना अगदी कमी दरात विविध शेतीसंबंधित उत्पादन उपलब्ध करून देणारी कंपनी, किंवा जगातील सगळ्यात वेगवान ,सुपरसाॅनिक ‘ब्राम्होस’ मिसाईल बनवणारी डायनालाॅग कंपनी अश्या स्वदेशी कंपन्यांवर एखादा साधा माहितीपटसुद्धा होऊ नये?

देशासाठी महत्वपुर्ण योगदान देणारी वव्यक्तिमत्वं ह्यांविषयी वार्तांकन करणं, माहिती देणं हे पण न्यूज चॅनेलचंच एक काम आहे.

तिकडे हाॅलिवूडमध्ये भारतीय वैज्ञानिक ‘श्रिनिवास रामानुजन’ ह्यांच्यावर चित्रपट निघून मोठा काळ लोटला, पण आमच्या स्वतःच्या देशात अजून मुख्य प्रवाहात तर सोडाच पण छोट्या पातळीवरसुद्धा त्यांच्यावर किंवा त्यांच्यासारख्या स्वदेशी वैज्ञानिकांवर चित्रपट निघत नाही. भूतकाळातल्या वैज्ञानिकांच्या बाबतीतही तेच. किंवा मग वर्तमानकाळात ‘अमोल यादव’ सारखे वैज्ञानिक ज्यांनी पहिलं पुर्ण भारतीय बनावटीचं विमान स्वबळावर बनवलं पण पैसे आणि इतर कारणांमुळे पुढे त्या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी असे महत्वाचे मुद्दे सोडून, जिकडून TRP अपेक्षित आहे – मग तो विषय किताही सवंग का असेना – त्यावर फक्त वार्तांकन केलं जातं. ह्यापेक्षा दुर्दैव ते काय ?

उरी सर्जिकल स्ट्राईकचे सर्वेसर्वा राजेंद्र निंभोरकर, सलगपणे कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघातील खेळाडू प्रतिभा जामवाल, आणि वर्तिका जोशी, विजयादेवी इ.सारख्या सागरी मार्गाने जगप्रदक्षिणा पुर्ण करणाऱ्या महिला अशा देशासाठी मोलाचे काम करणाऱ्या विविध व्यक्तीमत्वांविषयी जनतेला जास्त माहिती का नाही होत? कारण अश्या गोष्टींसाठी जास्तीत जास्त १५, २० मिनिटं आणि बाकी बजबजपुरीला पुर्ण दिवस, असा हा न्यूज चॅनेलचा प्राधान्यक्रम असतो. आजच्या काळात सोशल मिडीया वैगेरे जरी असली तरी पारंपारिक माहितीच्या साधनांवरच जनता जास्त लक्ष ठेवून असते,अवलंबून असते.

देशाच्या इतिहासात चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, महाराणा प्रताप, लचित बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, महादजी शिंदे एवढी महान व्यक्तिमत्वं असताना त्यांच्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत पुर्णपणे विषयाला वाहिलेला एकही चित्रपट येऊ नये?

अर्थात, अजिबातच काही नाही असंही नाही. बाजीराव बल्लाळ पेशवे, सुभाषचंद्र बोस इं. वर मागच्या काही काळात चित्रपट येऊन गेले. पण ह्या चित्रपटांमध्येही अनेकदा खूपच चुकीच्या गोष्टी/इतिहास दाखवला जातो. दिग्दर्शक त्याच्या सोईनुसार गोष्टी मोडूनतोडून दाखवतो. आणि मग पुढच्या पिढीत खूपच चुकीच्या गोष्टी पोहोचतात.

मुळात चित्रपट क्षेत्र, मालिका इ गोष्टी लोकांचं मनोरंजन करायला असतात ही बाब मान्य, त्यातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावण्याचे उद्दिष्ट ठेवणे ह्यातही काही गैर नाही. पण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की ह्या क्षेत्रांचा व्याप खूप मोठा आहे आणि इथून निघालेल्या गोष्टींचा समाजमनावर खूप परिणाम होत असतो. येणाऱ्या पिढीच्या घडणीतही “सध्याला” ह्या क्षेत्रांचा खूप मोठा परिणाम होत असतो. तेव्हा एक जबाबदारी डोक्यात ठेवून विषय निवडणं,काम करणं खूप महत्वाचं.

चित्रपट, मालिका, न्यूज चॅनेल्स ह्यांचा एकूणच राष्ट्रीय चारित्र्य घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे हाताळले जाणारे विषय हे काळजीने निवडले जावेत. योग्य त्या व्यक्तींविषयी योग्य तीच माहिती देणारी असावेत. ह्या गोष्टींमधून कायम एक चांगला, तत्वनिष्ठ संदेश देण्याचे उद्दिष्ट असावे आणि जनतेनेही अश्या विषयांचे स्वागत करावे.

त्यामुळे एक चांगला समाज घडायला नक्कीच मदत होईल! विचार नक्कीच व्हावा.

अजिंक्य रमेश पाटील

अजिंक्य रमेश पाटील हे HR तज्ञ असून आता व्यावसायिक होऊ पाहत आहेत. त्यांचा इतिहास, राजकारण, समाज आणि समाजशास्त्र या विषयांवर अभ्यास आहे.

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya चे अधिकृत मत,धोरण आणि मनोभूमिका कायम दर्शवितात असे नाही.

Tagged:

2 comments

  1. अगदी योग्य व विचार करायला लावणारा लेख आहे.

What do you think? Let us know!