कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असताना राजभवनात ‘चाय पे चर्चांना’ वेग आला आहे. मुंबई आणि इतर शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यावेळी तितक्याच झपाट्याने राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे केलेले संबोधन आणि त्यानंतर केंद्र व राज्यातील संघर्ष विकोपाला जाऊन तो ट्विटरवर आल्याचे दिसून येतो. यामध्येच तीन महत्त्वाच्या पक्षांनी मिळून महाराष्ट्रात स्थापन केलेल्या सत्तेसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य समोर आले आहे.

राज्याची दशा ही इतर राज्यांच्या तुलनेत बिकट असताना आलेले हे वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे कसे आहे? हे समजून घेण्यासाठीत्यांनी हे वक्तव्य का केले, याचे संदर्भ लक्षात घेणे गरजेचे ठरणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन होताना काँग्रेसची भूमिका ही महत्वपूर्ण ठरणारी होती. कारण काँग्रेस अध्यक्षांनी पाठिंब्याचे पत्र पाठविले नाही,म्हणून याआधी ही सत्ता स्थापन करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे नाट्य महाराष्ट्राने अनुभवलेले आहे.

परंतु, आज महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. यावेळी शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात निर्णय प्रक्रियेत आहे, आम्ही काँग्रेस म्हणून कोणतीच भूमिका बजावीत नाही आहोत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी फेसबुकवरुन संबोधन करताना केले आहे. ते नक्की काय म्हणाले? ते कोणत्या संदर्भात म्हणाले हे समजून घेणे आज गरजेचे ठरणार आहे.

राहुल गांधी यांचे फेसबुक संबोधन आणि त्याबाबत काही निरीक्षणे –

राहुल गांधींनी फेसबुकद्वारे देशाला केलेले संबोधन आणि त्यामध्ये साहजिकच केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी (अपेक्षित) अशी केलेली टीका होती. त्यांनी ती करावी. याबाबत राजकीय विरोधी पक्ष म्हणून त्यांना हक्क आहेतच. परंतु, त्यांनी त्यांच्या संबोधनात महाराष्ट्रात असलेल्या आघाडीवर केलेले भाष्य लक्षवेधी आहे.

ते म्हणालेकी,”आम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहोत, पण आम्ही निर्णयकर्ते नाही आहोत. आमचा सरकारला पाठिंबा आहे.” जेव्हा केंद्रीय स्तरावर आपण पंतप्रधानपदाची निवडणूक लढवलेली असते तेव्हा आपल्याकडून ही अशी विधाने अपेक्षित नसतात.

राहुल गांधी तुम्ही जबाबदारी कधी घेणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येऊन उभी ठाकली आहे; तेव्हा आपण ज्या सरकारमध्ये सहभागी आहोत, त्या सरकारचे यश-अपयश हे आपले यश-अपयश असते; हे राहुल गांधीना समजत नसेल, असे मला तरी वाटत नाही. त्यांना ते समजत असेल. कारण ते एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख नेते आहेत. 

परंतु सरकारमध्ये महत्वाचा सत्तेचा टक्का असताना, “आम्ही निर्णयकर्ते नाही आहोत” असे म्हणणे योग्य नाही. याचे कारण समजून घेतले पाहिजे.

मुख्यमंत्री पदावर जरी शिवसेनेचा आमदार विराजमान असला, तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जी खाती निर्णयप्रक्रियेत असतात ती खाती शिवसेनेकडे आहेत का?

आम्ही येत्या काळात जे काही होईल त्यासाठी शिवसेनेला लक्ष्य करणार आहोत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून केलेले हे विधान आहे का?हे समजून घेतलं पाहिजे. 

या काळात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे गृहखात्याचेपद हे राष्ट्रवादीकडे आहे. आरोग्यमंत्री आणि हे खातेही राष्ट्रवादीकडे आहे. त्यासोबतच अर्थखातेही याच पक्षाकडे आहे. म्हणजे शिवसेना हा पक्ष एकहाती सत्ता चालवीत नाही, हे उघड आहे. 

काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण म्हणालेकी,“हे शिवसेनेचे सरकार आहे.” म्हणजे महाविकास आघाडी म्हणून सत्ता चालविणाऱ्या पक्षांमध्ये ताळमेळ नाही का? मग हे चित्र काय दाखविते?

मुख्यमंत्री जेव्हा काही चर्चा करण्यासाठी बैठक घेत असतात, तेव्हा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे हजर असतात. ते माध्यमांना जेव्हा उत्तरे देतात तेव्हा आवर्जून सांगतात की, “मा.मुख्यमंत्री आणि आमच्यामध्ये संवाद आहे.” 

मग राहुल गांधी कुणाच्या बळावर हे असे विधान करतात? हे समजून घेतले पाहिजे.

जेव्हा आपण सत्तेचा हिस्सा खात असतो, तेव्हा त्या सत्तेबाबत बोलताना, आम्ही पाठिंबा दिला आहे असे म्हणतो? जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा काँग्रेसने आम्ही बाहेरून पाठिंबा दिला आहे, हे अधिकृतरित्या का नाही सांगितले? किमान समान कार्यक्रमावर (कॉमनमिनीममप्रोग्रॅम) हे सरकार स्थापन झालेले असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी असे बेजबाबदार वक्तव्य करणे कितपत योग्य आहे?

महाविकास आघाडीच्या सरकारचे मूल्यांकन करताना, सर्वात जास्त प्रमाणात राष्ट्रवादीच्या प्रमुख खात्यांच्या कामांचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. यानंतर सहभागी म्हणून काँग्रेस तितकीच जबाबदार असणार आहे. बाहेरून पाठिंबा जरी असेल, तरी तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला ते अपयशी ठरताना ‘तुम्ही का पाठिंबा दिला होता’,या प्रश्नाचे उत्तर देण्यास ते उत्तरदायी असणार आहेत. 

मुळात, या अशा काळात आम्ही शिवसेनेचे सरकार म्हणून संबोधित असताना,आपण आघाडी म्हणून सरकार स्थापन केले आहे, याची जाणीव या मोठ्या नेत्यांना असणे गरजेचे आहे.देश आणि राज्याची सत्ता मिळाल्यानंतर ती यशस्वी करायची असेल, तर जबाबदारी घ्यावी लागेल. 

योग्य वेळीयोग्य जबाबदारी घेतली तर लोक तुमच्याकडे आशेने पाहतील. पण अशा संकटाच्या काळात जबाबदारी झटकून आपले हात वर करायचे,हे निवडणुकीत हाताचा पंजा दाखविण्याइतके सोपे नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षांनी अशाप्रकारे राजकारण करणे म्हणजे लोकांना गृहीत धरण्यासारखे आहे.

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मधील जो विसंवाद आहे तो असा जाहीर पणे ट्विटर च्या माध्यमातून लोकांना समजने म्हणजे लोकांना सत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. राजकीय पक्षांनी सत्तेत असताना एक जबाबदार पणाने वागणे अपेक्षित असते परंतू कोणत्याही राजकीय सभेत आश्वासने देण्याची सवय लागलेल्या राज्यकर्त्यांना ही अशी कोरोनाची महामारी सुरू असताना एक जबाबदार म्हणून उभे राहणे जमत नाही का? हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे.

राजकीय विश्लेषणामुळे या राज्यकर्त्यांना कधीच कोणताही फरक पडलेला दिसून येत नसतो.परंतू ज्या जनतेने आपणास निवडून दिले आहे,ज्यांनी सत्तेची खुर्ची दिली आहे त्यांना आपण जबाबदार आहोत ही नैतिक जाणीव आम्ही विसरलो आहोत या भ्रमात आज राज्यकर्ते वावरताना दिसून येत आहेत. कोरोनाचा हा काळ येत्या काळात आम्ही कसे असणार आहोत त्याची तयारी करणारा असेल तर आज राज्यकर्ते जे वागत आहेत त्यांनी आधी परिस्थिती समजून घेऊन आपला स्वार्थ बाजूला ठेवून जनतेला एक आश्वासक नेतृत्व देणे गरजेचे ठरणार आहे. कारण ‘श्रेयवादा मुळे आमची प्रगती खुंटली आहे’ हे सत्य आम्ही कसे नाकारू शकणार आहोत(?). त्यामुळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षांनी अशाप्रकारे राजकारण करणे म्हणजे लोकांना गृहीत धरणे आहे.

(हा लेख ह्या आधी The Tilak Chronicle मध्ये प्रसिद्ध झाला होता.)

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya चे अधिकृत मत,धोरण आणि मनोभूमिका कायम दर्शवितात असे नाही.

Tagged:

What do you think? Let us know!