‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या सुरेश भटांच्या ओळीची आज नव्याने प्रचिती आली ती वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक वाचून. शतकाचा महानायक ठरवता येईल असं एक व्यक्तिमत्व. उभं आयुष्य आपल्या ध्येयासाठी वाहून देणारा एक निष्काम कर्मयोगी! अमेरिकेच्या निर्जिव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणारा महामानव.  

असं म्हणतात कि ‘रॅग्स टू रिचेस’ म्हणजेच माणसाचा गरिबीतून श्रीमंतीकडे झालेला प्रवास सांगणाऱ्या कथा जगात आशावाद जपून ठेवण्यास मदत करतात. पण कार्व्हर यांची कहाणी… छे कहाणी कसली…त्यांचं ते चरित्र मानवतावादावरचा विश्वास अजून घट्ट करतं.  

अशा कार्व्हरांना पुनर्जीवित करुन वीणा गवाणकर यांनी लोकांसमोर आणलं आणि ते ही मराठीत, याचा अभिमान नकळत मनाच्या कोपऱ्याला स्पर्श करुन जातो.

कार्व्हर चरित्र वाचलं की, डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. चित्र, एका प्रवासाचं. चित्र, ज्यात एका बाजूला सर्व दूर पसरलेला काळोख; कधी न संपणारं अंधःकाराचं युग. ज्यात आहेत फक्त कष्ट, दारिद्र्य, शोषण आणि ज्याच्या मध्यभागी वाहते आहे – काळ्या रक्ताची धार.  

तितक्याच प्रकर्षानं दुसऱ्या बाजूला दिसतं प्रखर सूर्याचं तेज, दिसते एक निष्पाप आशावादी सकाळ. दिसतो एक प्रवासी ज्याचं शरीर आहे झिजलेलं पण मन आणि डोळे सकारात्मक स्वप्नांनी दिपलेले. तो प्रवास म्हणजे इतिहास आणि प्रवासी अर्थातच …कार्व्हर.  

कार्व्हरांनी आयुष्यभर आपल्या वर्णामुळे अवहेलना आणि कष्ट सोसले. परंतू, यामुळे आलेल्या नकारात्मक विचारांवर त्यांनी ज्या पद्धतीने मात केली ती पद्धत भावी पिढ्यांनी आदर्श ठेवावा अशी आहे. 

कार्व्हरांनी जे कष्ट आयुष्यभर सोसले, त्यांना सामोरे जाताना माणसं एकतर हिंसेचा मार्ग निवडतात किंवा मनात जन्मभर एक न्यूनगंड बाळगून जगतात. कार्व्हरांनी यापैकी काही केलं नाही.

याऊलट, त्यांनी शिक्षणाला आपलं शस्त्र बनवलं आणि आपल्या बुद्धीची धार तीक्ष्ण करत सर्व प्रकारच्या न्यूनगंडांवर मात केली. आपल्या जीवनाची मशाल बनवत, मान आणि इच्छाशक्ती गमावून बसलेल्या आपल्या बांधवांना, एका नवीन दिशेकडे मार्गस्थ केलं. आधुनिक अमेरिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच जणू!

कार्व्हरांचं चरित्र बरंच काही शिकवून जातं. आजच्या आमच्या गोंधळलेल्या पिढीसाठी ते फक्त प्रेरणादायी नव्हे तर एक उत्तम मार्गदर्शक पण ठरु शकतात. ध्येय म्हणजे काय याचं उत्तर कार्व्हरांची जीवनगाथा वाचली कि उमगतं.  

आजपर्यंत ज्याला मी ध्येयं म्हणायचो, ती फक्त वैयक्तिक पातळीपुरती मर्यादित होती. पण आता प्रश्न पडतो की वैयक्तिक आकांक्षेला ध्येयाची चादर घालणं कितपत योग्य आहे? ‘ध्येय’ या शब्दाची चौकट ‘मी’ आणि ‘माझा’ या स्वार्थाच्या पलीकडे असली पाहिजे .  

कार्व्हर चित्रकलेत आणि पियानो वाजवण्यात निष्णात होते. त्यांनी काढलेलं चित्र पॅरिसच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर जगात सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवता आला असता. पण या मार्गाने समाजाचा आणि मुख्यतः आपल्या निग्रो बांधवांचा जीवनोद्धार करता येणार नाही म्हणून ‘ध्येय’ क्षेत्र निवडलं – शेती , केमर्जी आणि मायकोलोजी.  

या क्षेत्रांमध्ये पण ठरवलं असतं तर स्वतःच्या नावावर कमीत कमी 500 पेटंट्स घेऊन, घरी बसून चैन करु शकले असते पण पुन्हा तेच. ध्येय महत्वाचं. म्हणून तर एडिसन आणि हेनरी फोर्ड सारख्या लोकांकडून चालत येणारी लक्ष्मी नाकारली. आज लहानसहान गोष्टींच्या पेटंट्सवरुन वरुन होणारे क्षुल्लक विवाद पाहिले कि न चुकता आठवतात कार्व्हर.

आजकाल प्रेरणादायी वक्त्यांमुळे ‘नाही म्हणण्याची कला’ या संकल्पनेला बरंच महत्त्व प्राप्त झालं आहे. खरंच, नाही म्हणता येणं ही एक कलाच आहे. कारण अशावेळी समोरचा दुखावला जाऊ नये याची पण काळजी घ्यावी लागते. कित्येकदा मग त्यासाठी खोटंसुद्धा बोलावं लागतं. पण समाजात जो या कलेचा वापर दिसतो ते फारच वरवरचं आहे.  

उदाहरणार्थ, आपण ‘मी पार्टीला जायला नाही म्हटलं’ हादेखील त्या ‘नाही’ म्हणायच्या कलेचा एक भाग समजतो. आणि मग तिथून जन्माला येतात ‘माय लाइफ, माय चॉईस, माय फ्रीडम’ सारख्या म्हणी. खरंतर नाही म्हणण्याची कला आपल्या ध्येयाशी निगडित आहे. माझ्या ध्येयापासून मला लांब नेणारी गोष्ट किंवा व्यक्ती किती ही आकर्षक असली तरी तिला नाही म्हणता येणं यात कला आहे. ही कला शिकायची तर कार्व्हरांकडून.  

करिअर निवडताना त्यांनी चित्रकला आणि संगीताला ‘नाही’ म्हटलं. पुढे टस्कीगीला जायचं म्हणुन आपल्याला स्थिर भविष्य देणाऱ्या शिक्षकाच्या नोकरीला ‘नाही’ म्हटलं. ध्येयप्राप्तीसाठी चाललेल्या संशोधनात व्यत्यय नको म्हणून एडिसनने देऊ केलेले वार्षिक एक लाख डॉलर्सचे वेतन नाकारलं. एवढंच काय तर आयुष्यभर फक्त एकच कोट घातला – तो पण मित्रांच्या प्रेमापोटी.  

तसं बघितलं तर कार्व्हर आपलं संपूर्ण आयुष्य ‘नाही’ म्हणतच जगले. ‘नाही म्हणण्याच्या कलेचा’ चा मानवी अवतारच जणू!

कार्व्हर चरित्र वाचल्यावर राहून राहून विचार येतो की, आपल्या देशात का नाही जन्माला आला असा एखादा कर्मयोगी?  

‘वसुधैव कुटुंबकम्’ ही विचारधारा जरी मनात बाळगली, तरी आत खोलवर रुतलेला ‘भारतीय’ काही आरामात बसू देत नाही . आणि मग उत्तर सापडतं, अरे आपल्याकडे पण होता की एक असाच एकध्यासी भारतरत्न ज्याने आख्ख्या कर्नाटक राज्याचा कायापालट करुन दाखवला. एक अद्वितीय अभियंता – ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’. पण दुर्दैव हेच की जसे कार्व्हर लोकांपर्यंत पोहोचले नाहीत तसेच विश्वेश्वरय्यांचं नाव उरलं ते फक्त भारतरत्न मिळवलेल्या लोकांच्या यादीत.  

एक मोठ्ठा लेख लिहिता येईल एवढं साम्य आहे या दोघांमधे. पण मनातले विचार इथेच थांबत नाही. कार्व्हर आणि विश्वेश्वरय्यांकडे अत्यंत आदराने बघणारी नजर हळूच स्वतःकडे वळते आणि प्रश्नापासून सुरु झालेला प्रवास परत प्रश्नावरच येऊन थांबतो – कुठे आणि कधी सापडणार मला माझ्यातला कार्व्हर ? 

(This post was first published here on The Tilak Chronicle.)

योगेंद्र परांजपे

योगेंद्र परांजपे मर्चंट नेव्ही मध्ये अभियंता आहेत.

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya चे अधिकृत मत,धोरण आणि मनोभूमिका कायम दर्शवितात असे नाही.

Tagged:

What do you think? Let us know!