Site icon Lokmaanya

महत्वाकांक्षांचा संघर्ष रंगवणारी ‘सर्वोत्कृष्ट नाट्यमय मालिका’ – सक्सेशन

succession poster

मालिकेचा मूळ संघर्ष तिच्या शीर्षकातच सामावून घेत ‘सक्सेशन’ असं नाव ठेवलं आहे. Source: HBO.

२०१९ मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’ संपताना (आणि नेटफ्लिक्स सर्व बाजूंनी HBOला वरचढ ठरत असताना) HBO आता गेम ऑफ थ्रोन्सच्या तोडीचं नवीन काय उभं करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता, आणि HBOने त्यांच्या दर्जाच्या ख्यातीप्रमाणे तेवढीच नाट्यपूर्ण मालिका लाँच केली. ती म्हणजे ‘सक्सेशन’.

‘सक्सेशन’ ही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे फँटसी किंवा ऐतिहासिक मालिका नसली तरी तीतसुद्धा एका खुर्चीसाठी चाललेला खेळ आहे. ही खुर्ची आहे ‘वेस्टर रॉयको’ ह्या बलाढ्य माध्यम समूहाची. लोगन रॉय हा ८० वर्षांचा उद्योजक या समूहाचा सर्वेसर्वा आहे. ब्रिटनमधून अमेरिकेत येऊन त्याने जगातील पाचवा सगळ्यात मोठा माध्यम समूह उभारला आहे आणि त्याला आता हा सगळा उद्योगाचा भार त्याच्या चार मुलांवर सोपवायचा आहे.

मालिका लोगनच्या ८० व्या वाढदिवसाला, जेव्हा तो हे हस्तांतरण करणार आहे, त्या दिवशी सुरु होते. केंडेल हा त्याचा दोन नंबरचा मुलगा त्याची खुर्ची मिळवेल आणि बाकी हक्क तसेच मालमत्तेची समान वाटणी होईल असा सगळ्यांचा कयास असतो. पण लोगन ८० व्या वर्षीही सगळे हक्क स्वतःकडेच राखून ठेवतो, आणि तो खुर्चीवर अजून पाच वर्षं तरी बसलेला राहील असं सांगतो. शिवाय तो आपल्या तिसऱ्या बायकोला (जी त्याच्या एकाही मुलाची आई नाहीये) अधिकारांचा मोठा वाटेकरी करतो, ज्यामुळे  मुलांच्या हाती अगदीच क्षुल्लक जबाबदाऱ्या येतात. हे हस्तांतरण कोणालाच पटत नाही, म्हणून चारही मुलं लोगनकडे असहमती दर्शवायला जातात, इतक्यात लोगनला हृदयविकाराचा झटका येतो. आणि तिथून खरा सक्सेशनचा, म्हणजेच उत्तराधिकारी निवडण्यातला खेळ सुरु होतो.

आपण अनेक वेळा दोन कंपन्यांमधला, दोन स्पर्धकांमधला संघर्ष दाखवणाऱ्या कथा पाहिलेल्या आहेत. त्याहून जवळचा संघर्ष कुटुंबातील दोन भावांमध्ये होतो. सक्सेशनमध्ये हे सगळं तर आहेच, पण इथे चार भावंडांसोबतच त्यांचे वडीलसुद्धा त्यांच्या विरोधात आहेत. सावत्र आईचा काहीच अंदाज लागत नाही. त्यामुळे ही लढाई चार भावंडांची आपापसातली, बाहेरील स्पर्धक आणि शिवाय मुलं (विशेषतः केंडेल) विरुद्ध वडील अशी तिहेरी होते. म्हणूनच मालिकेचा मूळ संघर्ष तिच्या शीर्षकातच सामावून घेत ‘सक्सेशन’ असं नाव ठेवलं आहे.

मालिकेतील बऱ्याच गोष्टी मरडॉक कुटुंबातील गृहकलहावर आधारित आहेत हे एव्हाना कळलंच असेल. मालिकेचा निर्माणकर्ता जेसी आर्मस्ट्राँगनं स्क्रिप्टचं शीर्षकसुद्धा आधी ‘मरडॉक’ म्हणूनच नोंदवलं होतं, पण नंतर ते बदललं गेलं. तरीही लोगन रॉय आणि रुपर्ट मरडॉक यांच्यातील साम्य अगदी स्पष्ट दिसतं. दोघांमध्ये बाहेरून येऊन अमेरिकेत इतकं मोठं साम्राज्य उभं करणं, वयाच्या अगदी उशिराच्या काळापर्यंत त्यावर आपली पकड मजबूत ठेवणं, आणि स्वतःची मुलं इतका मोठा व्यवसाय सांभाळण्याच्या कुवतीची न निघणं ही सगळी साम्यं देखील पाहायला मिळतात. 

रॉय कुटुंबातील साधारण गणितं अशी आहेत. घरातला मोठा मुलगा कॉनर सगळ्यापासून स्वतःला अलिप्त दाखवत असतो. पण त्याची अलिप्तता सुद्धा श्रीमंती थाटाची, मनस्वी अशी आहे. त्याच्या अतिशय वेगळ्या महत्वाकांक्षा दुसऱ्या सीजनला स्पष्ट होतात. (शिवाय तो इतर तिघांचा सावत्र भाऊ असल्याने थोडा अंतर राखूनच असतो.) केंडेल हा दुसरा मुलगा लोगन इतका आक्रमक आणि खंबीर नसला तरी चौघांमध्ये तोच एक लोगनचा सगळा उद्योग सांभाळण्याची जबाबदारी घेऊ इच्छितो आणि तसा वागतोसुद्धा, त्यामुळे त्यालाच सगळं मिळणार असं आपल्याला वाटतं. पण तसं होत नाही म्हणून केंडेल आणि लोगन यांच्यातला संघर्ष अजूनच पेटतो.

शिव ही लोगनची मुलगी त्याच्या सगळ्यात जवळची आहे. ती हुशारही आहे, पण तिनं आजवर वडिलांच्या कंपनीत कधीच काम केलं नाहीये त्यामुळे तिचा इकडचा अनुभव खूपच कमी आहे. तिनं तेच दहा वर्ष राजकरणात एक उत्तम पीआर एजंट म्हणून काम केलं आहे, जिथे तिच्या हुशारीची चुणूक दिसली आहे. पण शिवच्या संपूर्ण पात्रात तिचा होणारा नवरा टॉम आणि त्याला निस्तरत राहणे हा भाग खूप मोठा होतो. चौथा मुलगा आहे रोमन, ज्याला कोणीच कधी गंभीरपणे घेत नाही. पण कंपनीची सध्याची तात्पुरती मुख्य असणारी जेरी त्याला जास्त जवळची आहे. त्यामुळे तिला तो गादीवर बसलेला हवा आहे. असा हा सगळा सावळा गोंधळ आहे.

रॉय कुटुंब. Source: HBO

इथे भाऊ, बहिण, वडील, जावई सगळेच एकमेकांकडे संशयाने बघतात. प्रत्येकजण दुसऱ्याचा अदमास घेत असतो, त्यामुळे ही नाती सर्वथा स्वार्थाभोवती फिरतात. एकजण दुसऱ्याला जेव्हा एखादी गोष्ट सांगतो तेव्हा नक्की त्यावर विश्वास ठेवावा का, हे समोरच्या पात्राला कळत नाही आणि प्रेक्षक म्हणून आपलीही तीच अवस्था होते. कुठलंही एक विश्वासू पात्र इथे नाही ज्याच्या मूल्यांना धरून आपण मालिका बघू शकतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण सुद्धा सतत बाजू बदलत राहतो. ही या मालिकेची आणखी एक वेगळीच गंमत आहे. शिवाय रॉय हे कुटुंब एवढं गर्भश्रीमंत आहे की, प्रत्येक भागात घडणारं नाट्य हे एका वेगळ्याच लोकेशनवर घडत असतं, त्यामुळेही त्यातील सतत बदलत असणारी समीकरणं पाहणं खूप रंजक होत जातं.

असं म्हणतात की प्रेक्षकांना सिनेमातील पात्र बदलताना पाहायचं असतं पण मालिकेतील पात्रं बदललेली त्यांना आवडत नाहीत. त्यांना रोज त्याच एका पात्राला भेटायचं असतं. मग तुम्ही ओळखीची पात्रं अजून ‘इंटरेस्टिंग’ कशी करू शकता? तर पात्रामध्ये बदल न करता त्याचे एक एक पदर समोर आणत, उलगडत, तरंच त्यात प्रेक्षकाला रस राहतो. सक्सेशनला बरोबर हीच गोष्ट खूप उत्कृष्टपणे करता आली आहे.  

पात्रांचं सतत अविश्वासू असणं, अनपेक्षित गोष्टी करणं आणि मुख्य म्हणजे त्यांचा थांग न लागू देणं हे सगळं जेसी आर्मस्ट्राँगने त्याच्या लेखनातही फार सुंदर पद्धतीने उतरवलं आहे. संवाद लेखनसुद्धा असं आहे की एखादी व्यक्ती जे प्रत्यक्ष बोलते त्यापेक्षा इतर वेगळेच अर्थ आपल्याला लागत असतात. त्यांचे ‘पॉजेस’, आणि त्यांचं कॅमेरानं टिपणं यातून आपल्याला त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी वेगळं पिकत आहे हे कळतं पण ते काय हे मात्र समजत नाही.

विशेष म्हणजे हे लेखन आणि विषय ह्या सगळ्याच्या चर्चेनं ही सिरीजसुद्धा गेम ऑफ थ्रोन्ससारखीच खूप गंभीर असेल असं वाटतं, पण तसं अजिबात नाही. लेखकांनी संवादात, पात्रांच्या सवयींत, व्यक्तिमत्वांत, आणि परिस्थितींमध्ये विनोद पेरला आहे. या फॉर्मला अनुसरून साथ दिली आहे ॲडम मॅके (ऑस्कर जिंकणाऱ्या ‘द बिग शॉर्ट’चा दिग्दर्शक) आणि मार्क मिलोडच्या दिग्दर्शनानं. आपण रॉय कुटुंबाच्या घरातच घुसून सगळं बघत आहोत असा आभास तयार करण्यात दिग्दर्शक आणि छायाचित्रकार चांगलेच यशस्वी झाले आहेत.

सक्सेशन मधील एक प्रसंग. Source: Craig Blankenhorn/HBO

कॅमेरा हाताळण्याची पद्धत ‘डॉक्युमेंटरी/मॉक्युमेंटरी’ सारखी असल्याने हा ‘फ्लाय ऑन द वॉल’ असल्याचा भास अजूनच वाढतो. ही द बिग शॉर्टच्या वेळी वापरलेली टेक्निक इथे आणखी पुढे नेली आहे. एखादी व्यक्ती सहज चार चौघात अवघड गोष्ट बोलून गेली आणि ती कॅमेराच्या क्लोजअप मधून सुटली, असं इथे होत नाही. उलट, तिला अवघड वाटत असतं तेव्हा डॉक्युमेंटरी प्रमाणे तिच्या अवघडलेल्या हालचालींवर क्लोजअप घेतला जातो, त्यामुळे मालिकेचा बाजही हलका फुलका राहतो आणि शिवाय पात्रांचे मनसुबे स्पष्ट करायलाही ह्या पद्धतीची मदत होते.

सक्सेशनच्या अजून एका पैलूचं असंच कौतुक झालं आहे, ते म्हणजे त्याचं संकलन. डॉक्युमेंटरीसारखं शूट करूनही प्रसंगांच्या भावनिकतेला धक्का पोहोचू न देणारं असं सक्सेशनचं संकलन आहे. विशेषतः पहिल्या सीजनच्या सहाव्या भागाच्या संकलनाचं खूप कौतुक झालं होतं, आणि तो खास अभ्यासण्यासारखाच आहे.

कमालीचा नटसंच एकत्र आणणं हे चांगल्या HBO सिरीजचं व्यवच्छेदक लक्षण असतं, आणि सक्सेशनच्या बाबतीतही त्यांनी ते पाळलं आहे. इथे ब्रायन कॉक्स सारखा तगडा अभिनेता लोगन रॉयच्या भूमिकेत उभा आहे. त्यासमोर मुलं म्हणून जेरेमी स्ट्राँग, सारा स्नूक, मॅथ्यू मॅकफायडेन अशी एकाहून एक तगडी नटमंडळी एकत्र आली आहेत.

२०२० ह्या एका वर्षातल्या एमी पारितोषिकांसाठी सक्सेशनमधील तब्बल १० जणांनी नामांकनं पटकावली, आणि सक्सेशननं ‘सर्वोत्कृष्ट नाट्यमय मालिका’ हे पारितोषिकही पटकावलं. यावरूनच मालिकेतील अभिनयाचा दर्जा लक्षात येतो.

एकीकडे माध्यम समूह सांभाळताना कुटुंबात होणारी उलथा पालथ, दुसरीकडे स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठीची धडपड. कोणाची ‘स्पेसशिप’ तयार करण्याची इच्छा तर कोणाची थेट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्नं. राजकारणातील घडामोडी एका माध्यम समूहाच्या हातात कशा येतात इथपासून ते पारंपारिक श्रीमंत आणि नव श्रीमंत यांच्यातला वाद, इथपर्यंत सगळ्याचं एकत्रित मिश्रण म्हणजे सक्सेशन. तिथे माणूस, नाती ह्यापेक्षा महत्वाकांक्षा जास्त महत्वाची आहे. म्हणूनच सक्सेशनच्या खुद्द लेखकांनीच मालिकेचं, त्यातील वातावरण, रॉय कुटुंब ह्याचं वर्णन करताना म्हटलेली ओळ आठवते – ‘धिस इज अ शिट शो ॲट द फक फॅक्टरी’.

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya चे अधिकृत मत,धोरण आणि मनोभूमिका कायम दर्शवितात असे नाही.

Exit mobile version