१० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्त्या प्रतिबंध दिवस मानला जातो. स्वतःला ठार मारून टाकण्यासाठी केल्या जाणाऱ्या विध्वंसक कृत्यास आत्महत्त्या म्हणता येईल. पशु- पक्षांसह सर्व सजीवांमध्ये स्वतःचं संरक्षण करण्याची, जिवंत राहण्याची सहजप्रवृत्ती दिसून येत असताना काही महाभागांमध्ये मात्र आपलाच जीव घेण्याची प्रेरणा का दिसून येत असावी ?

ज्यांच्या डोळ्यांपुढे काळोख आहे, ज्यांना आपल्या भविष्यात अंधार दाटून आला आहे असं वाटतं, ज्यांना आशेचा कोणताही किरण दिसत नाही, अशा खिन्न मनःस्थितीतील व्यक्ती आत्महत्त्येकडे वळत असाव्यात. हा झाला आत्महत्त्येच्या संदर्भातला ढोबळ विचार. पण प्रत्यक्षात, आत्महत्त्यालक्षी वर्तनाचा प्रकार मात्र तेवढा साधा-सरळ नाही; तो अत्यन्त क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाचा आहे.

आत्महत्त्या करणारी व्यक्ती खरंच एवढा तर्काधिष्ठीत विचार करत असेल का? खरं तर आत्महत्त्या म्हणजे क्षणिक उर्मीच्या आहारी जाऊन केलेले आततायी कृत्य. मग अशा उर्मीप्रधान वर्तनामागे कोणती कारणं असावीत?

आत्महत्त्येच्या संदर्भातील विचार तीन पातळ्यांवरून करता येईल – आत्महत्त्येचा विचार मनात येणं, तसा प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नात यशस्वी होणं. या तीनही पातळ्यांची तीव्रता आणि त्यांची कारणंही वेगवेगळी असू शकतात. मुख्यतः या कारणांचा शोध घेणंही अत्यंत जिकिरीचं ठरतं कारण गेलेल्या व्यक्तीशी आपण संवाद साधू शकत नाही; केवळ तर्काच्या आधारे तिच्या आत्महत्त्येमागची कारणं जाणून घेऊ शकतो.

तसं पाहता, आत्महत्त्येचा केवळ विचार करणारी व्यक्ती आत्महत्त्येसाठी सहसा घातक मार्गांचा अवलंब करत नाही, कारण अशा व्यक्तीच्या मनात शेवटपर्यंत जगण्याची दुर्दम्य इच्छा असते. अशा व्यक्तीनं आत्महत्त्येचा केलेला प्रयत्न ही केवळ तिने मदतीसाठी इतरांना मारलेली हाक असते – मी संकटात आहे, मला कोणीही समजून घेत नाही, या जगात माझं कोणी नाही मग मी या संकटातून बाहेर कसा पडू ? माझ्याकडे बघा. मी एकटा पडलोय …. असा तो पुकारा असतो.

अशी व्यक्ती मग झोपेच्या गोळ्यांचा छोटा डोस घेते किंवा इतरांच्या उपस्थितीतंच मनगटाची नस कापून घेते. याचाच अर्थ, संकटानं कितीही बेजार झाली असली तरीही अशा व्यक्तीमध्ये जगण्याची अभिलाषा शिल्लक असते.

आत्महत्त्येचा विचार इतरांजवळ बोलून दाखवणाऱ्या अथवा तसे संकेत देणाऱ्या व्यक्ती आत्महत्त्येचा हमखास प्रयत्न करतात असाही ठोस निष्कर्ष आपण काढू शकत नाही. कारण आत्महत्त्या करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आपल्या मनातले विचार कोणाजवळही बोलून न दाखवताच आत्महत्त्या करीत असल्याचं निदर्शनास येतं.

आत्महत्त्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने लिहिलेली चिठ्ठी (suicidal note) तिच्या जवळपास सापडली तर थोडाफार उलगडा होऊ शकतो, पण बरेचदा अशा चिठ्ठयांमध्ये शिक्षण, व्यवसाय अथवा प्रेमातील अपयशाचा थेट परंतु अत्यंत त्रोटक उल्लेख पहायला मिळतो. यातील काही चिठ्ठया दीर्घ असल्या तरी त्यातील संदर्भ संदिग्ध स्वरूपाचे आणि म्हणूनच अनाकलनीय असतात. त्यातून व्यक्तीच्या खिन्नतेशी निगडित असलेल्या, परस्परांमध्ये गुंतलेल्या अनेकविध धाग्यादोऱ्यांचा उलगडा होणं कठीण असतं.

सध्या तर तरुणांमध्ये सामाजिक माध्यमांद्वारे मित्रांशी अथवा जवळच्यांशी संपर्क साधून त्यानंतर आत्महत्त्येचा मार्ग अवलंबण्याची लाट आलेली पहायला मिळत आहे. अशा वेळी त्या व्यक्तिपर्यंत पोहचण्याआधीच लाख मोलाचे आयुष्य संपुष्टात आलेलं असतं. सध्याच्या काळात अपघातांपेक्षा आत्महत्त्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी असलं तरी हे असे मृत्यू जास्त धक्कादायक असतात. त्यातही किशोरावस्थेतील अथवा प्रौढावस्थेतील म्हणजेच कार्यक्षमतेच्या सर्वोच्च स्थितीत घडणाऱ्या आत्महत्त्या तर खूपच दुःखद आणि सर्व संबंधितांना हादरवणाऱ्या असतात.

मानासशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आत्महत्त्येच्या निर्णयासाठी अथवा कृतीसाठी एकच एक कारण जबाबदार नसतं. परस्परांशी संबंधित अशा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामांचा तो परिपाक असतो. हे सर्वसंभव घटक ढोबळमानाने तीन प्रकारात मोडतात: जैविक अथवा शरीरशास्त्रीय, मानासशास्त्रीय, आणि सामाजिक .

काही व्यक्तींचा त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय रचनेमुळे आत्महत्त्या करण्याकडे कल झुकतो. परिस्थिती फारशी तणावपूर्ण नसली तरी अशा व्यक्ती आत्महत्त्येकडे वळतात. त्यांना आत्महत्त्याप्रवण बनवते ती त्यांच्यातील अनुवंशिक पार्श्वभूमी! तर काही व्यक्तींमध्ये आनंदाचा स्रोत असणाऱ्या मेंदूतील  ‘ ‘सेरोटोनिन ‘ नामक रसायनाचा अभाव असल्यामुळे त्या निराशेच्या आहारी जातात.

या जीवशास्त्रीय कारणांखेरीज काही मानसशास्त्रीय कारणंही आत्महत्त्येसाठी जबाबदार ठरू शकतात. पालकांकडून होणाऱ्या सदोष संगोपन पद्धतींमुळे काही व्यक्तींमध्ये आततायीपणा, उर्मीप्रधानता (परिणामांचा आणि एकंदरच सारासार विचार न करता कोणत्याही प्रसंगाला तत्काळ दिली जाणारी प्रतिक्रिया) यांसारख्या गुणवैशिष्टयांचा विकास होतो.

काही व्यक्तींमध्ये मुळातच काही वैचारिक दोष आढळून येतात. त्यांच्यातील अवास्तव, अतार्किक व अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने विचार करण्याची, साध्या प्रसंगांचाही चुकीचा व नकारात्मक पद्धतीने अन्वयार्थ लावण्याची, अकारण स्वतःला दोष देत राहण्याची, किरकोळ संकटांचाही बाऊ करण्याची प्रवृत्ती त्यांना खिन्न बनवते. मग अशा व्यक्ती इतरांमध्ये न मिसळता, सण-समारंभांचा आनंद न घेता स्वतःला इतरांपासून दूर, स्वतःच्या कोषात ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जवळच्या व्यक्तींकडून अथवा मित्र-मैत्रिणींकडून मिळणाऱ्या आधारालाही त्या मुकतात.

काही व्यक्ती खरंचच संकटांमधून जात असतात. त्यापैकी काही संकटं तत्कालिक स्वरूपाची असतात. उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, आजारपण, सामाजिक अप्रतिष्ठा, आर्थिक नियोजन ढासळणे इ. तर काही दीर्घकालीन स्वरूपाची असतात. उदा. दैन्य, बेकारी, अभावात्मकता, जुनाट आजारपण इ.

परंतु अशा संकटांमधून जाणाऱ्या सगळ्याच व्यक्ती आत्महत्त्या करीत नाहीत. यातील बऱ्याच लोकांमध्ये तणावांचा सामना करण्याची, समस्यांचा परिहार करण्याची कौशल्यं असतात, मात्र काहींमध्ये त्यांचा अभाव असतो. अशा व्यक्ती किरकोळ पेचप्रसंगांचाही सामना करू शकत नाहीत. मोठ्या संकटांमध्ये तर त्या पुरत्या कोलमडून जातात. त्यांच्यातील सारासार विचार करण्याची, निर्णय घेण्याची, तणावांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता पूर्णपणे निकामी होते. अशा व्यक्तींमध्ये संकटांना तोंड देण्याऐवजी त्यांच्यापासून पळ काढण्याची प्रवृत्ती दिसून येत असल्यानं त्यांच्याबाबतीत आत्महत्त्येची शक्यता वाढते.

मुळातंच सुंदर जीवनाचा त्याग करून आत्महत्त्येचा पर्याय निवडणं दुर्दैवी आहे. असे लाख मोलाचे जीव वाचवणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य असलं तरी आत्महत्त्याप्रवण व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना मानसिक बळ पुरवणं, आत्महत्त्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींवर मानसोपचार करणं आणि एकूणच आत्महत्त्येच्या विरोधात समाजात जनजागरण करणं ही कामगिरी प्रशिक्षित समुपदेशक जास्त चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतात. शाळा – महाविद्यालयांमध्ये, उद्योगजगतात, इतकेच नाही तर निरनिराळ्या समुहांपुढे दिल्या जाणाऱ्या प्रेरक व्याख्यानांमुळे व त्यायोगे होणाऱ्या विचारमंथनामुळे सुद्धा जनजागरणाचं काम होऊ शकतं.

आत्महत्त्येकडे झुकलेलं मन (suicidal mind) मुळातंच कमकुवत असतं, तर संकटांचा सामना करणारं मन मुळात कणखर असतं. असं कणखर मन प्राप्त करण्यासाठी आपल्यातील मानसिक लवचिकता वाढवण्याची आवश्यकता असते. त्यासाठी स्वतःला ओळ्खण्याची, स्वतःतील मर्यादांचा स्वीकार करण्याची, सामाजिक आधार मिळवण्यासाठी जवळचे संबंध प्रस्थापित करण्याची आणि मैत्री जपण्याची गरज अशा व्याख्यानांमध्ये पुनःपुनः उच्चारली पाहिजे. असं झालं तर निदान शिक्षण, व्यवसाय आणि प्रेम यांमधील अपयशातून घडणाऱ्या आत्महत्त्यांचं प्रमाण कमी होऊ शकतं.

आत्महत्त्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला मात्र मानसोपचाराची नितांत गरज असते. सर्वात आधी अशा व्यक्तीशी लगेच संपर्क साधून तिच्याशी बोलण्याची आणि मुख्य म्हणजे तिला बोलतं करून तिचं ऐकून घेण्याची गरज असते. तिला चुकीचं ठरवून तिच्यावर टीका करण्याऐवजी तिच्या भूमिकेत शिरून, तिच्या समस्या ऐकून तिच्याशी संवेदनपूर्ण बोललं तर तिच्या मनावरील बराच ताण कमी होऊ शकतो.

गरज पडल्यास तिच्या मनावरील चिंता, भय, निराशा यांचं सावट दूर करण्यासाठी परिणामकारक औषधांचाही वापर केला जातो.

प्रथमोपचाराच्या या टप्प्यात एक कुशल मानसोपचारक समोरील व्यक्तीशी स्नेह, विश्वास, सामंजस्य, आणि स्वीकार यांच्या आधारे प्रेममय संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी होतो/होते. याच टप्प्यात उत्तम संवादकौशल्यं आणि तणावांचं व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेलं कसब आत्मसात करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत केली जाते. तर दुसऱ्या टप्प्यात त्यानं प्रकट केलेल्या विचारांचा पुनरुच्चार करीत त्यातील दोष त्याच्या निदर्शनास आणून दिले जातात.

उदा. “मी नापास झालो, आता हे अपयश खांद्यावर घेऊन मी कसा जगू ? आई-वडिलांना, जगाला तोंड कसं दाखवू?” असं म्हणणाऱ्या तरुणाच्या यशापयशाच्या व्याख्या बदलण्यासाठी, त्याच्या मर्यादांचा स्वीकार करण्यासाठी व त्या मर्यादेतील इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.

“मी धंद्यात साफ बुडालो, आता जगून काय करू?” असं म्हणणाऱ्याला त्याचं आर्थिक गणित नव्यानं बसवून देण्यासाठी फार मोठी उडी घेण्याऐवजी छोट्या व्यवसायांमधून पुन्हा जागेवर आणण्याच्या विवेकी पर्यायांचा विचार केला जातो, आर्थिक सवलतींची माहिती मिळवण्यासाठी मदत केली जाते. मुख्य म्हणजे, हे पेचप्रसंग सोडवण्यासाठी धीर व संयम आवश्यक असल्याचंही त्याला सुचवलं जातं. याखेरीज हळूहळू गमावलेला स्व-आदर आणि आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी, मनोबल उंचावण्यासाठी, स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी त्याला उद्युक्त केलं जातं.

एकूणच, आत्महत्त्येची इच्छा नाहीशी होऊन पुन्हा जीवनाला सामोरं जाण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत त्या व्यक्तीच्या सोबत राहून तिला मानासिक बळ पुरवण्याचं काम एक तज्ज्ञ समुपदेशक करतो/करते. काही शहरांमध्ये तर आत्महत्त्येच्या घटना टाळण्यासाठी काही स्वयंसेवी संघटनांद्वारे चोवीस तास दूरध्वनी सेवा पुरवली जाते.

सरतेशेवटी, निराशा, अर्थहीनता आणि असहाय्यतेकडून अर्थपूर्णता, आत्मनिर्भरता आणि स्वयंपूर्णते कडे जाणाऱ्या या प्रवासात केवळ समुपदेशकाचीच नाही तर कुटुंबातील अन्य व्यक्तींची, मित्र – मैत्रिणींची साथ जर त्या व्यक्तीला मिळाली, तर एक जीवन पुन्हा उभं राहू शकतं.

“एक अंधेरा – लाख सितारे, एक निराशा – लाख सहारे!”

खरं ना ?

डॉ उज्ज्वला करंडे

डॉ उज्ज्वला करंडे ह्या मानसशास्त्रच्या प्राध्यापिका आहेत.

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya चे अधिकृत मत,धोरण आणि मनोभूमिका कायम दर्शवितात असे नाही.

Tagged:

What do you think? Let us know!