अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आणि त्यानिमित्ताने ह्या विषयाशी सबंधित चित्रपट, मालिका ह्यांचा आढावा आपण घेत आहोत. आता निवडणुका होऊनही दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. ह्यावेळच्या निवडणुकानंतरचं सगळं नाट्य शेवटाला आलेलं असताना आपली ही लेखमालाही संपत आली आहे. अमेरिकन सिनेमा, मालिकांची यादी आपण ह्या आधीच पाहिली आहे. त्यातील अनेकांवर आम्ही स्वतंत्र लेखही छापून आणले आहेत. पण आज आपण माहिती घेणार आहोत ती अमेरिकन निवडणुकांवर आलेल्या आणि गाजलेल्या अशा काही माहितीपटांची.
माहितीपट हे माध्यम कसल्याही कथानकाचा आधार न घेता, काल्पनिक गोष्टी टाळून त्याला जे म्हणायचं आहे ते थेट आपल्यासमोर पोहोचवतं. अमेरिकन निवडणूक प्रक्रिया मुळात इतकी किचकटआहे की त्यावरील सिनेमांपेक्षा माहितीपटांमधून ती अधिक चांगली कळू शकते. शिवाय त्यातील कमतरताही आणखी स्पष्टपणे दिसून येऊ शकतात. म्हणून आज आपण अमेरिकन निवडणूक प्रक्रियेसंबंधी असणाऱ्या माहितीपटांची ओळख करून घेणार आहोत.
- काही गाजलेले माहितीपट
द ग्रेट हॅक (२०१९) (Netflix): २०१६ च्या अमेरिकन निवडणुकीत केंब्रीज ऍनालीटीकाने काहीतरी घोळ घातले होते, त्यात रशियन हॅकर सामील होते. अशा काही उडत्या बातम्या आपल्या कानी आल्या होत्या. पण त्यात नेमकं काय घडलं हे मात्र तपशीलवार माहिती नसतं. आणि ते जाणून घ्यायचं असल्यास ‘द ग्रेट हॅक’ हा माहितीपट पाहावा.
केंब्रीज ऍनालीटीकाने निवडणुकीत नक्की काय काम केलं? ह्याचा शोध ह्या माहितीपटात घेतला जातो. प्रत्येक मतदार संघातील मतदारांची माहिती फेसबुकने केंब्रीजला विकली. त्याप्रमाणे कुंपणावरचे (ट्रम्प किंवा हिलरीच्या बाजूने जे झुकले नसतील असे) मतदार ओळखून त्यांना हिलरी क्लिंटन विरोधातील जाहिराती कशा परत परत दाखवल्या गेल्या ह्याची तपशीलवार माहिती ह्या माहितीपटातून आपल्याला मिळते.
द ग्रेट हॅक’ केंब्रीजच्या कामांचा शोध तीन मार्गांनी घेते. एक अमेरिकन पत्रकार ब्रिटनमध्ये येऊन केंब्रीजबद्दलची माहिती मिळावी ह्यासाठी खटला दाखल करतो. दुसरीकडे केंब्रीजमध्ये अनेक वर्षं काम करणारी ब्रिटनी कैजर आणि तिसऱ्या बाजूने कॅरोल ही ब्रिटीश शोध पत्रकार. ह्या तिघांच्या नजरेतून आपल्याला हा माहितीपट दिसतो. त्यातील शोधांचा परिणाम म्हणजे फेसबुकसारख्या बलाढ्य संस्थेचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गला सुद्धा कोर्टात हजर राहावं लागलं होतं.
ह्या सर्व क्लिष्ट घटनांना नाट्यमय पद्धतीने दाखवत, उत्तम निर्मितीमूल्यं, उत्तम पार्श्वसंगीत हयासह नेटफ्लिक्सने हा माहितीपट कसा सर्वांना पाहण्यायोग्य होईल ह्याची काळजी घेतली आहे.

गेट मी रॉजर स्टोन (२०१७) (नेटफ्लिक्स): रॉजर स्टोन ही मुळातच एक वल्ली आहे. वाईट नाव झालं तरी नाव होणं महत्वाचं; ह्या मतांचा तो आहे. निक्सनच्या १९७२ च्या प्रचारप्रक्रियेपासून तो निवडणुकांची कामं पाहतो आहे. निक्सनला राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हायला लागलं त्यानंतरही त्याने निक्सनचा टॅटू पाठीवर गोंदवून घेतलाय. इतकं ते वेगळं वेगळं आणि लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्व आहे.
प्रचारात स्वतःच्या कामांऐवजी दुसऱ्याच्या कमतरता जास्त पुढे आणायच्या म्हणजे आपण कायम त्यांच्या भूमीत लढत राहतो. वादग्रस्त विधानं कशी करत राहायची. नकारात्मक प्रचाराचा वापर कसा करून घ्यायचा. एवढंच नव्हे तर विशीतच जीओपीच्या युवा शाखेच्या अध्यक्ष झालेल्या रॉजरने प्रचारासाठी बंधन असलेल्या रकमेच्या पलीकडे जात, इतर मार्गांनी पैसे कसे वापरावे ह्याचं पण तंत्र विकसित केलं आहे. आणि हे सर्व अनुभव असलेला माणूस मग हिलरीला जेलमध्ये टाका पासून ते अनेक प्रचारतंत्राच्या गोष्टी २०१६ च्या निवडणुकीत कसा वापरत गेला हे सर्व आपल्याला ह्या माहितीपटात पाहायला मिळतं.
नॉक डाऊन द हाऊस (२०१९) (नेटफ्लिक्स): राजकारणी स्त्रिया आणि त्यांचं करिअर कसं उभं राहिलं ह्याच्या कथा आपण अनेकदा ऐकतो. पण ह्या माहितीपटात त्या प्रत्यक्ष घडताना पाहायला मिळतात. २०१६ ते २०१८ ह्या दोन वर्षात नर्स, वेटर म्हणून काम करणाऱ्या काही सामान्य स्त्रिया त्यांच्या मतदारसंघातून उभं राहायचं ठरवतात. आणि तिथून ह्या माहितीपटाच्या प्रवासाला सुरुवात होते.
त्यातील सर्वात मोठं झालेलं नाव म्हणजे अलेक्झांड्रीया ओकाशिओ-कोर्टेझ. ह्या केवळ २९ वर्षांच्या वेटर मुलीने २०१८ च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वात महत्वाच्या तिघांमध्ये गणल्या जाणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीत हरवलं. ती एका अर्थाने न्यू लेफ्टचा, अमेरिकेतील नव्या पर्यावरणवादी गटाचा चेहरा म्हणून समोर येत आहे.
पण तिचा आणि तिच्यासारख्या अनेकांचा प्रवास कुठे सुरु होतो हे पाहायचं असल्यास, अगदी सामान्य माणसापासून राजकारण कसं सुरु होतं हे पाहायचं असल्यास हा माहितीपट त्याचं उत्तम उदाहरण आहे. थोडीशी स्वप्नाळू, थोडीशी एका बाजूने झुकलेला असला तरी त्याच्या महत्वकांक्षेसाठी ह्या माहितीपटाचं नाव ह्या यादीत येणं भाग होतं.
2. निवडणुकांचे हिरो
अमेरिकेत उमेदवारांचे प्रचारप्रमुख कायमच महत्वाचे राहिले आहेत. १९६० पासून माध्यमांनी निवडणुकीवरचा पगडा जसा वाढवत नेला तसा ह्या प्रचारप्रमुखांचा प्रभावही वाढत गेला आहे. काळानुसार प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधनं, त्या अंमलात आणणं ज्यांना जमलं त्यांचे उमदेवार आजवर जिंकले आहेत. त्यांच्यातील काही जणांवर बनलेले हे काही माहितीपट.
द वॉर रूम (१९९३): १९९२ ला थोरले जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष होते आणि पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले होते. गेल्या १०० वर्षात अमेरिकेत केवळ तीनच वेळा राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या निवडणुकीत हरल्याचा इतिहास होता. शिवाय बिल क्लिंटन स्वतः अत्यंत तरुण (राजकारणात ज्याला अनअनुभवी म्हणतात) आणि नवखे होते. तरीही ते निवडणूक कसे जिंकले ह्याची कथा द वॉर रूममध्ये पाहायला मिळते.
वॉर रूम म्हणजे निवडणुकीची सर्व कामं पाहण्यासाठी, प्रचारातील गोष्टी ठरवण्यासाठी जी जागा वापरली जाते ती. ह्या माहितीपटाची उत्तम गोष्ट म्हणजे त्यांनी जवळपास एक वर्ष क्लिंटन आणि कारव्हील ह्यांच्या सोबत राहून तिथे काय बोललं जातं, काय चर्चा होतात, कुठली धोरणं कशी ठरवली जातात हे सर्व शूट केलं. आणि पहिल्यांदाच ते जनतेसमोर आणलं. (भारतात असं काम An Insignificant Man ह्या अरविंद केजरीवाल वरील माहितीपटाने केलं आहे.) बिल क्लिंटन जसे ह्या निवडणुकीत डार्क हॉर्स ठरले तसंच अजून एक नाव प्रामुख्याने पुढे आलं आणि ते नाव होतं प्रचारप्रमुख जेम्स कारव्हील. हे नाव पुढे चालून इतकं मोठं झालं की त्याने अनेक देशात जाऊन तिथल्या निवडणुकांचे प्रचार तंत्र ठरवले आहेत.
अवर ब्रँड इज क्रायसिस (२००५): बोलिव्हियातील २००२ ची राष्ट्रप्रमुखाच्या निवडणूकीत परत एकदा जेम्स कारव्हील हाच प्रचार प्रमुख होता. पण हा माहितीपट वॉर रूमसारखा केवळ प्रचारातील गोष्टी दाखवत नाही. जेम्स कारव्हील ज्यांचा प्रचार प्रमुख होता, ज्यांनी निवडणूक जिंकली त्यांचेच हात मुळात रक्ताने माखलेले होते. त्यामुळे वॉर रूमच्या पुढे जात, युधाखोरीने निवडणूक जिंकण्यासारख्या अनेक वाईट गोष्टी पुढे आणणारा असा हा अत्यंत महत्वाचा माहितीपट आहे.
तसेच २००० ची वादग्रस्त निवडणूक धाकट्या बुशना जिंकून देणाऱ्या मार्क मॅकीनन ह्यांनीही स्वतः त्यांच्या प्रचारतंत्राची माहिती देणाऱ्या काही फिल्म्स केल्या आहेत. (How to Win an Election?) त्याही जरूर बघाव्या अशा आहेत. निवडणूक कधी ताळतंत्र सोडायला लागते. नैतिकता नक्की किती घसरल्यावर ती सोडून द्यावी अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर तो बोलतो. शिवाय मॅकीनन २०२० च्या निवडणुकीवर ‘क्रायसिस’ नावाची सिरीज केली आहे तीही जरूर बघण्यासारखी आहे. (मॅकीननच्या सर्व फिल्म्स YouTube वरती उपलब्ध आहेत.)
3. निवडणुकांमधील फेरफार आणि काही माहितीपट
निवडणुकीत केल्या जाणाऱ्या किंवा शक्य असलेल्या घोटाळ्यावर संशोधन करणारेही काही माहितीपट आहेत. जसे की…
हॅकिंग डेमोक्रसी (२००६) (YouTube): २००० सालच्या निवडणुकीत एका मशीनने अल गोअरची एका ठिकाणची मते मायनस मध्ये मोजली होती. म्हणजे त्या जागेवर अल गोअरला उणे सोळा हजार मते मिळाली आणि इतर ठिकाणची टोटल करताना त्यातून ती कमी केली गेली. ह्या घटनेपासून हा माहितीपट चालू होतो. आणि सबंध व्यवस्थेत काय त्रुटी आहेत ते शोधून काढतो.
ह्या मशीन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत. त्या अमेरिकेत माहितीच्या अधिकाराखाली येत नाहीत. त्यामुळे एकदा मशीन समोर आली की ती सरकारी अधिकारी फक्त वापरू शकतात. त्यात काही त्रुटी निघाल्या तरी ते प्रश्न विचारू शकत नाहीत. न्यायालय त्या बाबतीत ह्या खासगी कंपन्याविरोधात काही करू शकत नाही. पण ह्या माहितीपटाची खासियत म्हणजे बेव्ह हॅरीस आणि हॅरीस हरस्टी (आणि त्यांची ब्लॅक बॉक्स वोटिंग संस्था) आपल्याला प्रत्यक्ष मशीन घेऊन निकाल हॅक करून दाखवतात. मशीन बनवणाऱ्या अतिगोपनीय कंपनीमध्ये जाऊन लपून घेतलेली मुलाखत दिसते, शिवाय एके ठिकाणी तर चक्क फेकून दिलेल्या मटपत्रिकाही सापडतात. अशाप्रकारे अनेक धक्कादायक गोष्टी ह्या माहितीपटाने समोर आणल्या आहेत.

किल चेन (२०२०) (YouTube): हॅकिंग डेमोक्रसीच्याच टीमने केलेला आणि नवीन काळातील प्रश्न पुढे आणणारा असा हा माहितीपट आहे. मतदान यंत्र हे इंटरनेटला जोडलेलं नसतं त्यामुळे त्यात फेरफार करणं महाकठीण असं सांगितलं जातं. पण पुन्हा एकदा हॅकिंग डेमोक्रसीची टीम आजच्या काळातली यंत्रं नेटशी जोडून दाखवतात. आणि ती हॅकही करून दाखवतात.
हे दोन माहितीपट नक्कीच बघावे असे आहेत. त्यात केलेलं काम, आणि प्रत्यक्ष मतदान यंत्रं मिळवून डेमो करून दाखवणं ही ह्या दोन्ही माहितीपटांची जमेची बाजू आहे.
4. ऐतिहासिक माहितीपट
ह्याशिवाय एकंदर निवडणुका आणि अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील महत्वाचे काही माहितीपट. ज्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. ते म्हणजे…
प्रायमरी (१९६१) – निवडणुकांवर बनलेला कदाचित पहिला अमेरिकन माहितीपट जो केनेडीच्या संपूर्ण प्रचाराचं चित्रांकन करतो. एक तरुण सिनेटर अध्यक्षपदाची मनीषा ठेवतो पासून ते निक्सनसारख्या मुरब्बी राजकारण्याला हरवण्यात केनेडीने कसं प्रचारतंत्र अवलंबलं ह्याचं चित्रण ह्या माहितीपटात आहे.
चीजम’७२ (२००४) (YouTube) – अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभी राहणारी पहिली महिला चक्क एक कृष्णवर्णीय महिला होती. आणि तेही ती ७२ मध्ये उभी राहिली होती. आज ५० वर्षानंतरही ही गोष्ट शक्य झाली नाहीये. पण कृष्णवर्णीय आणि त्यात महिला अशा दोन्ही गोष्टी असूनही चीजमने हे धाडस केलं आणि प्रायमरी निवडणूक लढवून दाखवली. त्याचीच माहिती देणारा असा हा माहितीपट.
बॉब केनेडी फॉर प्रेसिडेंट (२०१८) (नेटफ्लिक्स) – १९६८ ची निवडणुक अमेरिकन प्रतिगामी राजकारण बदलण्यात खूप जास्त महत्वाची ठरली. निक्सनचं निवडून येणं आणि समाजामधील पुरोगामी लोकांबद्दलचा राग ह्या एकत्र घडलेल्या घटना होत्या. पण त्याच निवडणुकीत एक असा उमेदवार होता, जो निवडून येईल ह्याकडे अनेक पुरोगामी लोक डोळे लावून बसले होते. आणि तो म्हणजे जॉर्ज केनेडीचा सख्खा भाऊ बॉब केनेडी. भावाचीच धोरणं, त्याच्याच इतका देखणा नसला तरी तीच आश्वासनं देणारा चेहरा म्हणून बॉब केनेडी पुढे येत होता आणि प्रचाराच्या अर्ध्यातच त्याचा खून झाला. ह्याचीच कथा आपल्याला सांगितली जाते नेटफ्लिक्सच्या ह्या नव्या माहितीपटात. तसा हा खून बराच विस्मृतीत गेलेला आहे. पण ह्या व्यक्तिमत्वाचं आणि त्याच्या जाण्याचं महत्व ह्या माहितीपटातून आपल्याला नक्की समजेल.
असे हे निवडणूक प्रक्रियेकडे अनेक अंगांनी बघणारे माहितीपट आहेत. त्यांचा इतिहास, त्यातील त्रुटी, नवीन तंत्रज्ञानासोबत उभे राहिलेले प्रश्न ह्याचा खोलात जाऊन अभ्यास करणारे हे माहितीपट आहेत. भारतीय निवडणूक प्रक्रियेवर जेंव्हा केंव्हा प्रश्नचिन्ह उमटतं तेंव्हा आपल्याकडे आपली काही मतं असतात पण माहिती कधीच नसते. ह्याची वानवा हे माहितीपट बघून जाणवली आणि हीच गरज कदाचित उद्या आपल्याकडे काही चांगले माहितीपट बनवायला कारण ठरेल असं समजूया आणि ह्याच सकारात्मक मुद्द्यावर आपली ही लेखमाला संपवूया.

सुदर्शन चव्हाण
सुदर्शन चव्हाण फेसबुकवरील 'सिनेमा अँड' पानाचे लेखक आणि व्यवस्थापक आहेत. ते टीव्ही मालिका, विविध कार्यक्रम, पुरस्कार समारंभ आणि 'रियॅलिटी शोज' साठी लेखन करतात, आणि महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती आणि लघुपटांवर काम करतात. ते सकाळ वृत्तपत्र (मुंबई आवृत्ती) यातही टीव्ही मालिकांबद्दल लेखन करतात.
The views and opinions expressed in the above article belong to the author(s) and do not necessarily represent the official opinion, policy or position of Lokmaanya.