‘हाऊ आय मेट युवर मदर’ मधील मुख्य पात्र (टेड मोजबी) दर वर्षी हॅलोवीनला कुठल्याही सैतानाचा किंवा भुताचा पेहराव घालत नसतो. तो सलग दहा वर्ष हँगिंग चॅड घालून फिरत असतो. आता हे हँगिंग चॅड काय प्रकरण आहे? आणि हे त्याला कुठल्याही सैतानापेक्षा भयानक का वाटतं?

हँगिंग चॅड म्हणजे अमेरिकन निवडणूक प्रक्रियेतील २००० साली बाहेर आलेली मोठी खोट आहे. तेंव्हा अमेरिकेत किंवा निदान फ्लोरिडा राज्यात उमेदवाराच्या नावासमोर पिन टोचून तिथल्या कागदाला छिद्रं करून मत देण्याची पद्धत होती. छिद्र पडण्यासाठी तिथला कागद पूर्ण फाटणं गरजेचं असायचं पण त्याऐवजी कागद जर लटकत राहिला तर त्याला म्हणतात हँगिंग चॅड. अशी हँगिंग चॅड राहिलेली हजारो मतं २००० सालच्या बुश विरुद्ध अल गोअर निवडणुकीत मोजलीच गेली नाहीत. त्यामुळे हे हँगिंग चॅड प्रकरण पुढचा अनेक काळ चर्चेत राहिलं.

हॅलोविनला हँगिंग चॅड घालून फिरणारा टेड मोजबी Source: Twentieth Century Fox Television

बुशची ही कारकीर्द (जी वर्ल्ड ट्रेड सेंटरला चालू होत अफगाणीस्तान, इराक युद्ध करत अमेरिकेला मंदीच्या खाईत लोटत संपली) आणि निवडणूक प्रक्रियेचा हा घोळ टेड मोजबीला सैतानापेक्षा जास्त भीतीदायक वाटतो, म्हणूनच तो हॅलोवीनला असा हँगिंग चॅड घालून फिरत असतो.

हे तर झालं हा घोळ बाहेर आल्यानंतरचं प्रकरण. पण २००० सालच्या निवडणुकीत असं काय घडलं होतं की हा प्रकार बाहेर आला? ह्याची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे ‘रिकाऊंट’.

Recount: (Hotstar)

‘रिकाऊंट’ हा संपूर्ण सिनेमा घडतो २००० सालची निवडणूक ते निकाल घोषित होणे ह्या दोन गोष्टींच्या दरम्यान. साधारणतः निवडणुकीनंतर निकाल लागण्याचा कालावधी एक दिवसाचा असतो हे पाहण्याची आपल्याला सवय आहे. पण त्या साली मतमोजणीतले आणि अमेरिकेन निवडणूक प्रक्रियेतील इतके घोळ बाहेर आले की, ही प्रक्रिया एक महिन्यापेक्षाही जास्त काळ चालू होती. आणि त्यात नक्की काय काय घडलं ते आपल्याला रिकाऊंट हा सिनेमा दाखवतो.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल कॉलेज जिंकण्याची गरज असते. सिनेमाच्या सुरुवातीला ४९ राज्यांचा निकाल लागूनही राष्ट्राध्यक्ष कोण होईल ह्याचं चित्र स्पष्ट होत नाही. तेंव्हा शेवटचं राज्य असलेल्या फ्लोरिडाकडे सगळ्यांच्या नजरा वळतात. तिथे एकूण २५ इलेक्टोरल कॉलेज होते. त्यामुळे जो फ्लोरिडा जिंकेल तो अमेरिका जिंकेल असं ते समीकरण झालेलं असतं. 

वाहिन्यांवर बुशने फ़्लोरिडा जिंकलं अशा बातम्या यायला लागतात. आणि अल गोअर आपली हार कबूल करण्याचं भाषण करायला स्टेजवर जायला लागतो. त्याचे कित्येक समर्थक तो काय बोलणार ह्या उतुक्तेने प्रचंड गर्दी करून थांबलेले असतात. इतक्यात फ्लोरिडाच्या निवडणूक आयोगाच्या मतमोजणीत कळतं की फ्लोरिडामध्ये अल गोअर केवळ ५०० मतांनी मागे आहे. मतांचा फरक एवढा कमी असल्यास पुनर्मोजणीची मागणी करता येते. त्यामुळे अल गोअर हार स्वीकारण्याचं भाषण न करताच निघून जातो. त्याच्या भाषणाची वाट पाहणारे सगळे लोक, वृत्त वाहिन्या सगळेच बुचकळ्यात पडतात, एकच गोंधळ उडतो. आणि तिथून खरी सिनेमातील नाट्याला सुरुवात होते.   

तगडी स्टारकास्ट असणारा HBO चा अमेरिकन निवडणूक प्रक्रियेवर आधारित Recount. Source: amazon.com

रॉन क्लेन (केव्हिन स्पेसी) हा अल गोअरचा प्रचार प्रमुख असतो. आणि आता पुनर्मोजणीच्या मागणीपासून ते कोर्टाकडून ती मान्य करून घेणं हे सगळं त्याला करायचं असतं. ह्यात निवडणूक प्रक्रीयेबाबतचे अनेक मुद्दे समोर येत जातात. आणि अमेरिकन लोकशाहीच्या सर्व प्रणालीमधल्या चुका बाहेर यायला लागतात. जशा की,  

१. मतदानाची तांत्रिक बाजू

२. राज्य शासनाचा कारभार

3. न्यायव्यवस्था

१. मतदानाची तांत्रिक बाजू

उमेदवाराच्या नावासमोरील कागदाला पिन मारून छिद्र पाडायचं आणि तो कागद मशीनमध्ये टाकल्यानंतर ते छिद्रं कसं मोजलं जातं किंवा कसं मोजलं जात नाही. हे सिनेमामध्ये अगदी कमी वेळात फारच सुंदर पद्धतीने दाखवलं आहे.

कधी कागद अर्धवट फाटून त्याचा हँगिंग चॅड होत असतो तर कधी पिन बोथट असल्याने केवळ उभार तयार होतो. ज्याला डिंपल म्हणतात. त्यामुळे असं घडलेली हजारो मतं ग्राह्यच धरली गेलेली नसतात. आणि अशा मतांची संख्या हजारांपासून लाखांपर्यंत जाऊन पोहोचते. तर दुसरीकडे बुशची आघाडी केवळ काही शे मतांची असते. 

त्यामुळे अल गोअर आणि रॉन क्लेनची मशीन रिकाऊंटची मागणी करतात. ज्यात आघाडी ५०० मतांहूनही कमी होते. पण प्रश्न उरतो तो उरलेल्या, मशीनने न मोजलेल्या मतांचा. कारण मशीन अजूनही डिंपल आणि चॅड असणारी मतं नाहीच मोजू शकत. अशाप्रकारे तांत्रिक बाजू संपूर्णपणे फेल होते.  

म्हणून रॉन क्लेन आणि त्याची सगळी वकिलांची फौज मिळून चार मतदार संघात (कौंटी) हाताने रिकाऊंट करण्याची मागणी करतात. तीही मान्य होते. पण इथेच येते दुसरी समस्याप्रधान प्रणाली, आणि ती म्हणजे राज्य शासन.

२. राज्य शासन

इथे काही गोष्टी स्पष्ट करून घेऊया. अमेरिकेत भारताप्रमाणे स्वतंत्र निवडणूक आयोग नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातील निवडणूक प्रक्रिया वेगळी आहे. जसं काही ठिकाणी पोस्टाने केलेलं मत घेतलं जातं तर काही ठिकाणी नाही. काही ठिकाणी मशीन द्वारे मतदान केलं जातं तर काही ठिकाणी कागदी. प्रायमरी राऊंडमध्ये काही राज्यात आजही आवाजी किंवा हात वर करून मतदान करण्याची पद्धत चालू आहे बरं का. (ज्याला तिथे कॉकस म्हणतात)

पण हा प्रश्न इथेच थांबत नाही. तर निवडणुका हाताळायची वेळ येते तेंव्हा ही सगळी जबाबदारी राज्य शासनाची असते. आणि राज्य शासन दोनपैकी एका पक्षाच्या हातात असतं. त्यामुळे त्या पक्षाच्या बाजूने निकाल लागेल अशा पद्धतीने ते प्रयत्न करण्याची शक्यता निर्माण होते. जे की स्वतंत्र निवडणूक आयोग असताना असत नाही.

रिकाऊंट सिनेमात नेमकं असंच काहीसं होतं. जेंव्हा चार मतदार संघात (कौंटीमध्ये) हाताने पुनर्मोजणीची मान्यता मिळते तेंव्हा राज्य शासन त्यात अडचणी निर्माण करायला सुरु करतं. कारण फ्लोरिडा राज्याचा गव्हर्नर असतो जेब बुश अर्थात जॉर्ज बुशचा सख्खा भाऊ.

मतमोजणीच्या वेळी तिथे विनाकारण हुज्जत घालणे, डिंपल आणि चॅड दिसत असले तरी दिसत नाहीयेत असं म्हणणे. आणि शेवटी तर मारामारी करायला उतरणे असं हे प्रकरण चांगलंच तापवलं जातं.

दुसरीकडे राज्य शासनाची तेंव्हाची निवडणूक प्रमुख असते कॅथरीन हॅरीस (लॉरा डर्न, एकंदर तिचा मेक अप आणि तिचा उथळ बाईचा अभिनय बघण्यासारखा आहे.). ही बाई एकीकडे बुशच्या प्रचार कार्यक्रम पाहत होती आणि दुसरीकडे तीच निवडणूकीचा कार्यभार सांभाळत होती. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर तिने प्रचंड अडथळे आणले. ती मुळात मशीन रिकाऊंटच्या वेळी प्रत्यक्ष प्रत्येक मतदानाचं रिकाऊंट घेण्याऐवजी एकगठ्ठा पुनर्मोजणी करते. आणि जेंव्हा हाताने रिकाऊंट सुरु होतो तेंव्हा ती रिपब्लिकन (म्हणजे तिचाच पक्ष) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ नजरेआड करत वेळेत रिकाऊंट झाला नाही म्हणून ती प्रक्रियाही बंद करायला लावते.

एवढं सगळं करूनही बुशची आघाडी चार एकशे मतांवर टिकून राहते. आणि परत एकदा अल गोअरची प्रचारफळी फ्लोरिडा कोर्टात जाणार हे रिपब्लिकन थिंक टँकला आणि विशेषतः जेम्स बेकरला कळतं. (टॉम विल्किन्सन) तेंव्हा तो अमेरिकेच्या फेडरल कोर्टात (आपलं सुप्रीम कोर्ट) एक केस करतो आणि इथेच येते बिघडलेली तिसरी प्रणाली.

3. न्यायव्यवस्था

फ्लोरिडा कोर्ट परत परत रिकाऊंटची परवानगी देतं. अर्थात सगळ्या गोष्टी कायद्यात बसवूनच. कारण तिथे नेमणूक झालेले बहुतांश न्यायाधीश डेमॉक्रॅटीक पक्षाने बसवलेले आहेत. तर शेवटच्या क्षणी सुप्रीम कोर्ट ही परवानगी नाकारत बुशला विजेता घोषित करतं कारण तिथले 9 पैकी 5 न्यायधीश रिपब्लिकन पक्षाने नियुक्त केलेले आहेत. आणि ते पाचही जण रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने निकाल देतात. ह्यावरून लक्षात येतं की अमेरिकेतील राजकीय पक्ष तिथल्या न्यायव्यवस्थेला किती सहजपणे वापरून घेऊ शकतात.

फेडरल कोर्टाच्या निर्णया नंतर २००० सालचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अल गोर ह्यांचा लढा संपुष्टात आला. Source: hbo.com

सुप्रीम कोर्टाच्या ह्या निकालाने अल गोअरचा पूर्ण ३६ दिवस चाललेला लढाच संपुष्टात येतो. बरं हा निकालसुद्धा इतका संशयास्पद असतो की न्यायालय स्वतःच ह्या निकालाचा दाखला परत कुठल्याही निकालाच्या वेळी देऊ नये हे स्वतःच स्पष्ट करतं.

त्यामुळे रॉन क्लेन, अल गोअर ह्याची अजून लढायची इच्छा असूनही ते ह्य निवडणुकीतून माघार घेतात. आणि ह्या नाट्यावर पडदा पडतो.

ह्या वादाचा निर्णय काय झाला हे आपल्या सर्वाना माहितीच आहे. बुश प्रशासनाची पुढची  आठ वर्ष म्हणजे अफगाणिस्तान, इराक युद्ध, आणि २००८ पर्यंत मंदीकडे सहज चालत गेलेली अमेरिकेन अर्थव्यवस्था. पण त्याची सुरुवातच मुळात इतक्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या निवडणुकीतून झाली होती, ही अजून एक निराश करणारी गोष्ट.

ह्या एका घटनेमुळे, ह्या एका निवडणुकीच्या निमित्ताने अमेरिकन निवडणूक प्रक्रियेतील चुकांचं, व्यवस्थेतील कमतरतांचं स्वरूप आपल्यासमोर आलं. आणि ‘रिकाऊंट’ सिनेमा ह्या कमतरता अगदी तपशीलासह आपल्या समोर मांडतो. इतकं की आपण ही फिल्म पाहतोय की ह्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करतोय असं आपल्याला वाटायला लागतं.

पण त्याच वेळी ह्या सर्व किचकट प्रक्रियेला सोपं करत, त्यातील नाट्य, चढ उतार दाखवत लेखक आपल्यासमोर मांडतो. ह्या सर्व घटना अल गोअरच्या वॉर रूममधून दिसत राहतात. तशाच बुशच्या थिंक टँकमधूनही दिसतात. त्यामुळे सर्व प्रक्रीयेला माणसं, त्यांच्या भावना ह्यांचा आधार मिळतो आणि ती फिल्म म्हणून तिथे खऱ्या अर्थाने यशस्वी होते. म्हणूनच डॅनी स्ट्राँगच्या ह्या पटकथेला अमेरिकेतील नामांकित ब्लॅक लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळालं होतं. आणि सोबतच HBO ची निर्मिती केव्हिन स्पेसी, लॉरा डर्न, टॉम विल्किन्सन अशा दिग्गज कलाकारांचा संच सोबत घेत अमेरिकन लोकशाही, निवडणूक प्रक्रिया ह्यावर प्रश्न उपस्थित करणारी एक अभ्यासपूर्ण कलाकृती आपल्याला पाहायला मिळाली. २०१६ सालच्या निवडणुकीत परत एकदा तीस लाख मतं जास्त जिंकूनही हिलरी क्लिंटन निवडणूक हरली हे त्याचं अजून एक द्योतक ठरलं.

अशाप्रकारे अमेरिकन निवडणूक व्यवस्थाच मुळात (मुळात निवडणूक आयोग नसल्याने ती एक व्यवस्था नाहीये तर पन्नास राज्यांच्या पन्नास वेगळ्या व्यवस्था आहेत.) एवढ्या समस्यांनी ग्रासली आहे की त्याचीच भीती वाटावी. म्हणूनच कदाचित (HIMYM च्या) टेड मोजबीला ‘हँगिंग चॅड’ हॅलोवीनच्या सैतानाचा पेहराव म्हणून वापरण्याइतक्या भयंकर वाटत असावा. कारण ही छिद्रं म्हणजे चुकीचं मतदानं नाहीत केवळ तर ती अमेरिकन लोकशाहीलाच पडलेलं छिद्रं आहेत.

सुदर्शन चव्हाण

सुदर्शन चव्हाण फेसबुकवरील 'सिनेमा अँड' पानाचे लेखक आणि व्यवस्थापक आहेत. ते टीव्ही मालिका, विविध कार्यक्रम, पुरस्कार समारंभ आणि 'रियॅलिटी शोज' साठी लेखन करतात, आणि महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती आणि लघुपटांवर काम करतात. ते सकाळ वृत्तपत्र (मुंबई आवृत्ती) यातही टीव्ही मालिकांबद्दल लेखन करतात.

Disclaimer

The views and opinions expressed in the above article belong to the author(s) and do not necessarily represent the official opinion, policy or position of Lokmaanya.

Tagged:

What do you think? Let us know!