एकीकडे महाराष्ट्रातील सत्ताकेंद्रातून नवीन चेहरे राजकीय पटलावर येताना, राज्यातील ही विधानसभा निवडणूक ‘सक्षम विरोधी पक्ष’ म्हणून पुढे येण्यासाठी लढवली जात आहे की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. हे चित्र निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आघाडीवर असल्याचे दिसून येते.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०१४ च्या निवडणुकीत देशात विरोधी पक्ष म्हणून कोणालाही संधी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली. यामुळे या अखंडप्राय लोकशाही देशाला विरोधी पक्षाची जागा रिकामी राहते काय अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले. 

वर्ष २००४ ते २०१४ दरम्यान सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष आणि संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाच्या कार्याला आश्वासक पर्याय म्हणून जनतेने २०१४ साली मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सारा देश विकास या नावाच्या मागे गेला. अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाने देशात जी शासनविरोधी लाट निर्माण झाली होती, तिचा फायदा सध्याच्या सरकारने करुन घेतला. 

भाजप २०१९ साली पुर्ण बहुमत मिळालेला पक्ष म्हणून उदयाला आला. पण, या लोकशाही देशात प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्रातही त्राण नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ विरोधी भूमिका घेण्यास कमी पडत गेला. 

ज्या राज्यात विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच सत्तारूढ पक्षाला जाऊन मिळतो, त्या देशात सरकारवर दबाव निर्माण करण्याची अपेक्षा कोणाकडून आणि का ठेवायची हा एक मुख्य प्रश्न जनतेला पडल्यावाचून राहत नाही.

रसातळाला गेलेली काँग्रेस आणि बुडत्या जहाजाला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी राष्ट्रवादी, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जनतेला विश्वासात घेण्यात नक्कीच कमी पडले. असे म्हटले जाते की, ‘निरंकुश सत्ता माणसाला भ्रष्ट बनविते’ आणि काही अंशी हे खरे आहे. सत्तेवर कुठलाच अंकुश नसेल तर सत्ताकेंद्र कोणालाच विश्वासात घेण्याचा प्रयत्न करीत नाही आणि यामध्ये भरडली जाते ती जनता. 

प्रमुख विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात कुठलाच पक्ष पुढे आलेला दिसत नसताना, ‘मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय’ अशी भावनिक साद घालत, या राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि मला विरोधी पक्षाची सत्ता द्या, अशी मागणी या देशात प्रथम राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी केलेली मागणी सद्य परिस्थितीला रास्त असली, तरी ते जितक्या जागांवरुन विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, त्यावरून एक मुख्य विरोधी पक्षाची भूमिका मिळवणे मनसेसाठी आव्हानात्मक आहे. ज्या राज्यात विरोधी पक्ष म्हणून सत्ता द्या, अशी भावनिक साद घातली जाते त्या राज्यात सत्ताकेंद्र आणि प्रमुख विरोधी आघाडी यांच्या भूमिकेतील ठळक विरोधी बाबींवर जनतेने लक्ष देणे गरजेचे ठरते.

साधारणपणे १९८० च्या दशकानंतर प्रादेशिक पक्षांचा वाढता परिमाण आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेमुळे कोणत्याही एका पक्षाला राज्यामध्ये सत्ता स्थापन करणे शक्य झाले नाही. काँग्रेसने जनसामान्यांचा पक्ष म्हणून आपली प्रतिमा पुढे केली. यावेळी सहकार, शिक्षण, शेती अशा गोष्टींबरोबरच बहुजनांची व अल्पसंख्यांकांची मते आपल्या बाजूला ठेवून सत्ता मिळविण्यासाठी हा पक्ष कायम आघाडीवर राहिला.

मध्यम वर्ग, हिंदुत्व ,शहरी मतदार ही भाजपची जमेची बाजू आहे, हे गेल्या दोन दशकांचे राजकीय विश्लेषण करताना समोर येते. भाजपनेही सहकार, शिक्षण, शेतीमध्ये असणारा वर्ग आपल्याकडे वळविला. यासोबतच अल्पसंख्यांक, बहुजन मतेही आपल्याकडे वळविण्याचा पक्षाचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. यामुळेच कालांतराने काँग्रेसचा मतदार वर्ग विभागला गेला आणि काँग्रेस पिछाडीवर जात असल्याचे दिसून आले.

जेव्हा २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस खिळखिळी होत होती, तेव्हा ‘वंचित बहुजन आघाडी’ या नावाने तिसरा गट राजकारणाच्या पटलावर सक्रिय केला गेला. वंचित बहुजनांची मते आपल्याकडे वळविण्यात प्रकाश आंबेडकर यांना काही प्रमाणात यश आले. राजकारणात विजयी होणे हे जवळचे ध्येय नसेल तर प्रमुख प्रतिस्पर्ध्याला आपल्या रणनीतीने पराभूत करायचे, या भूमिकेतून प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीने काँग्रेसची मते विभागली. याचा आपसुक फायदा जरी सध्या भाजप-शिवसेना युतीला झाला असला, तरी वंचित आघाडीला काँग्रेस पक्षाची जागा घेण्यात यश मिळाल्याचे दिसून येते.

म्हणूनच राज ठाकरेंनी घातलेली साद आणि प्रकाश आंबेडकर खेळत असलेली खेळी ही मुख्य विरोधी पक्ष म्हणून जनतेसमोर येण्यासाठी तर नाही ना, हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडणारा आहे. सत्ताकेंद्राला शमविण्यासाठी जेव्हा एक गट प्रबळ विरोधक म्हणून पुढे येतो, तेव्हा तो समकाळातील सत्ताकेंद्राच्या जवळ जाणारा गट म्हणून लोकांमध्ये प्रतिमा निर्माण करतो. यामुळे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना भाजपचा दुसरा गट म्हणून संबोधणाऱ्या अभ्यासकांना हे दोघेही कुठेतरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे येण्यासाठी हा डाव खेळत आहेत, हा पैलू नक्कीच विचार करायला लावणारा आहे.

सत्ताकेंद्राच्या लढतीमध्ये आज तरी काँग्रेस – राष्ट्रवादीसमोर भाजप – सेनेचे आव्हान आहे. तसेच, येत्या काळात आपला पारंपारिक मतदार आपल्यापासून दूर जाऊन आपली ताकद कमी करण्यासाठी होणारा प्रयत्न हाणून पाडण्याची मोठी कसोटी या दोन पक्षांपुढे आहे. महाराष्ट्रात एक गट जाहीरपणे विरोधी पक्षाची भूमिका मागताना तर दुसरा छुप्या पद्धतीने ती भूमिका मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

या परिस्थितीचा आज सत्तारूढ पक्षाला फायदा होत असला, तरी एक सक्षम विरोधी पक्ष मिळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकणारा विरोधी गट या राज्याला मिळणे ही सुद्धा एक गरज होऊन बसली आहे. म्हणून, जरी यंदाची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राज्यात सत्ता मिळविण्यासाठी लढली जात असली, तरी यामध्ये प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जनतेची कोणाला पसंती मिळते हे बघण्याजोगे ठरणार आहे. या निवडणुकीत हा वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा म्हणून समोर येईल. कारण, महाराष्ट्र हे देशाच्या विकासामध्ये मोठा वाटा उचलणारे राज्य आहे. यामुळेच या राज्यात निरंकुश सत्ता असणे, हे धोका निर्माण होण्याच्या परिस्थितीला खत पाणी घालणारे ठरू नये ही अपेक्षा.

येत्या काळात विरोधी बाकावर सत्ताकेंद्राला प्रश्न विचारणारा गटाची आवश्यकता असताना, जनता मात्र सत्ताकेंद्र आणि विरोधी केंद्राची बाजू पाहूनच यावेळी मतदान करणार आहे, हे नक्की.

(हा लेख ह्या आधी The Tilak Chronicle मध्ये प्रसिद्ध झाला होता.)

स्वप्निल करळे

स्वप्निल नंदकुमार करळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya चे अधिकृत मत,धोरण आणि मनोभूमिका कायम दर्शवितात असे नाही.

Tagged:

What do you think? Let us know!