चांद्या पासून बांद्या पर्यंत एकेकाळी रुजलेला पक्ष म्हणजे काँग्रेस. भारताला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी स्वातंत्र्यलढा दिलेली या देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण संघटना म्हणजे काँग्रेस. जहाल आणि मवाळ यांच्यापैकी कधी मवाळ तर कधी जहाल नेतृत्वाकडे आपली धुरा सोपवलेली आणि नंतर महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने स्वातंत्र्यलढा लढलेली काँग्रेस. आज मात्र “या पक्षाला कोणी जागे करेल का”, अशी शंका निर्माण करणारी सध्याची काँग्रेस.
एकेकाळी या देशाचे गृहमंत्रीपद भूषविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे एका प्रचारसभेत काँग्रेस थकली आहे अशी कबुली देतात. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका नक्की काय आहे, या प्रश्नापासून ते काँग्रेस खरंच थकली आहे की नाही अशी चर्चा फिरते. गेल्या १३५ वर्षांचा इतिहास असणाऱ्या संघटनेचे हे अपयश आहे असे म्हणावे लागेल.
काँग्रेस आणि महाराष्ट्र
महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आणि त्याआधी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता सत्ताधारी कळपात सामील झाला. काँग्रेसच्या विचारसरणीला मानणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असताना या राज्यातही पक्षाच्या नेतृत्वाने हाय खाल्ली.
युवकांना संधी देताना पुन्हा घराणेशाहीला पाठबळ देणाऱ्या काँग्रेसच्या हाय कमांडमुळे पक्षाची जनसामान्यांमधील प्रतिमा अविश्वसनीय स्वरुपाची झाली आहे,हे लोकांच्या आजच्या प्रतिक्रियेवरून नक्कीच लक्षात येते.
महाराष्ट्रात निघालेल्या जन आशीर्वाद यात्रा, महाजनादेश यात्रा, शिवस्वराज्य यात्रा यासारख्या विविध यात्रांमध्ये काँग्रेसने एकही यात्रा का काढली नसावी, याची कारण मिमंसा नक्की जनतेने करायची की नेत्यांनी करायची असा प्रश्न आहे.
राहुल गांधी यांच्याकडे युवा नेतृत्व म्हणून बघताना त्यांना मोदींसारख्या जनसामान्यांमध्ये प्रभावी असणाऱ्या नेत्याशी स्पर्धा करावी लागणे, हे त्यांच्यापुढील आव्हान आहे. देशाला आणि महाराष्ट्राला नवा विव्हर देण्यासाठी, युवकांना प्रेरीत करण्यासाठी एक आराखडा किंवा दृष्टिकोन असणे गरजेचे असते. अशावेळी काँग्रेसकडे एक चेहरा आणि दुसरे जिंकण्याची जिद्द नसणे हे या पक्षाच्या अपयशाचे कारण आहे.
खरंतर महाराष्ट्र आणि काँग्रेस हे एक समीकरणच. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या जन्माचा साक्षीदार आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी पुणे येथे घेतले जाणार होते. परंतू, पुण्यात प्लेगची साथ सुरु असल्याने ते मुंबईमध्ये घेतले गेले आणि ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. पुढील काळात राष्ट्रीय काँग्रेसची धुरा महाराष्ट्राने लोकमान्य टिळकांच्या रूपाने स्विकारली.
टिळकांच्या निधनानंतर गांधी पर्व सुरु झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसनेच या देशावर अधिक काळ सत्ता गाजवली. सत्ता गाजविणारा पक्ष ते थकलेला पक्ष अशी केविलवाणी अवस्था निर्माण झालेली असताना महाराष्ट्रात काँग्रेसला पुनरुज्जीवीत करू शकेल असे नेतृत्व न मिळणे, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल.
इंदिरा गांधी ते राहुल गांधी: कणखर नेतृत्वाचे होत गेलेले अवमूल्यन
देशाच्या राजकारणावर जसा राष्ट्रीय काँग्रेस म्हणून एका पक्षाचा आणि त्यांच्या संघटनेचा प्रभाव, वचक होता, त्याप्रमाणे काँग्रेसमधील नेतृत्वाचा करिष्माही तितकाच होता. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर लालबहादूर शास्त्रींनी या देशाचे नेतृत्व केले. नेहरूंचा अकाली मृत्यू आणि इंदिरा गांधींचे राजकीय वय कमी असल्याने लालबहादूर शास्त्रींसारखा नेता या देशाला मिळाला. परंतू, त्यानंतर यशवंतराव चव्हाण हे देशाच्या पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येताना गांधी कुटुंबाचा राजकीय पटलावर उदय झाला इंदिरा गांधी यांच्या रूपाने.
सत्तेच्या केंद्रस्थानी राहून सत्तेला आपल्याभोवती फिरवायची जादू असणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाने देशासाठी कणखर निर्णय घेतले आणि तितकेच धक्कादायकसुद्धा. या देशात आणीबाणी लादली गेली ही सर्वात मोठी ऐतिहासिक चूक होती, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहेच. परंतू, पुढे सरकणारी काँग्रेस एका विशिष्ट घराणेशाही आणि हाय कमांडचा शिक्का घेऊन लोकांसमोर आली.
इंदिरा गांधींसारखे निर्णय घेण्याची क्षमता असलेली नेतृत्वाची फळी पुढे काँग्रेसने अनुभवली नाही. पक्षाच्या हाय कमांड शैलीमुळे या देशात अनेक ‘काँग्रेसी’ संघटना निर्माण झाल्या. नव्या नेतृत्वाची हाक देताना राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे नाव पुढे करून काँग्रेसने घराणेशाहीची रेषा अधोरेखित केली.
देशातील प्रत्येक राज्यात गांधी घराण्याला रुजेल, पचेल असे नितृत्व देण्याच्या अट्टाहासामुळे संघटना कमकुवत बनत गेली. अलीकडे सुशीलकुमार शिंद्यांच्या वक्तव्याने ही बाब पुन्हा अधोरेखित नाही तर स्पष्ट झाली.
वर्ष २००९ नंतर २०१४ साली काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये लक्षणीय घट झाली. ज्या वाक्याने सुरवात केली, ते म्हणजे चांद्या पासून बांद्या पर्यंत जनसंपर्क असणाऱ्या पक्षाचा जनतेशी संपर्क नक्की का तुटला,याचे आत्मपरीक्षण राहुल गांधी यांना करावे लागेल.
काँग्रेसची सर्वात सकारात्मक बाब म्हणजे त्यांची संघटना. पण या पाच वर्षाच्या काळात त्यांची संघटना दुबळी झाली आहे. राजकारण बदलत असताना बदलणाऱ्या काळाला सुसंगत भूमिका ठेवून चालणे म्हणजे राजकीय पटलावर टिकणे असते. काँग्रेसने याउलट भाजपच्या उदयानंतर म्हणजे मोदींच्या करिष्म्यानंतर एक प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका घेण्याऐवजी मैदान सोडून अलिप्ततेची भूमिका घेतली.
ते कधी उजवेही नसतात तर ते डावेही नाहीत, अशी संभ्रमाची अवस्था जास्त काळ लोक सहन करीत नाहीत हे तितकेच खरे. मनोहर जोशी आणि नारायण राणे वगळता एकेकाळी ज्या महाराष्ट्राला सर्व मुख्यमंत्री हे काँग्रेसने दिले, आज त्याच राज्यात काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीपेक्षा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी जनतेला मान्य चेहरा नाही.
जनतेला विश्वासात घेऊन आपली भूमिका मांडणे आणि त्याचे मतांमध्ये रूपांतर करणे हे राजकीय नेत्यांचे खरे काम असते. यासाठी नेतृत्वही जनसामान्यांनी स्वीकारलेले असावे लागते. आजवर विलासराव देशमुख यांच्यानंतर तसे नेतृत्व महाराष्ट्रात नक्कीच नाही.
महाराष्ट्र आणि काँग्रेसचा विचार : सध्याची निवडणूक
सध्या महाराष्ट्रात सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार हे नाव आघाडीवर नक्कीच आहे. पवार यांचे काँग्रेस पक्षापेक्षा काँग्रेस विचारधारेशी असलेले नाते पाहिले तर सध्या महाराष्ट्रात काँग्रेसी विचार प्रबळपणे मांडण्याची भूमिका घेताना शरद पवार दिसत आहेत. महाआघाडी म्हणून काँग्रेस पिछाडीवर नक्कीच पडली, हे नाकारता येणे शक्य नाही.
देशाच्या इतिहासात १३५ वर्षाची संघटना इतकी दुबळी होते, याला सर्वस्वी पक्षाची भूमिका आणि नेतृत्वाने दिलेला चेहरा यांचे अपयश आहे. या निवडणुकीत काँग्रेसची नौका पाण्यात तरंगते की बुडते हे बघण्यासारखे आहे. कारण, जेव्हा पुढे प्रबळ विरोधक असतात तेव्हा लढायला पक्षाकडे धोरण असावे लागते.
निवडणुका ते निवडणुका दिसणारे काँग्रेसचे नेतृत्व लोकांना कितपत आकर्षित करेल,यात नक्कीच शंका आहे.
(हा लेख ह्या आधी The Tilak Chronicle मध्ये प्रसिद्ध झाला होता.)

स्वप्निल करळे
स्वप्निल नंदकुमार करळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.