महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या गणितामध्ये कायम चर्चेत असलेले नाव म्हणजे उदयनराजे भोसले. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत साताऱ्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जिंकल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. 

लोकसभेत निवडून येण्याच्या ज्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या पूर्ण झाल्यानंतर सत्तेच्या बाजूने दिसणारा कल बघून उदयनराजेंनी पक्ष बदलला? की येत्या काळात सत्तेच्या क्षितिजावरून राष्ट्रवादी काँग्रेसही बाहेर राहणार हा तर्क लावून? महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजलेले असताना सातारा लोकसभेची निवडणूक ही उदयनराजेंनी लादली की सातारकरांच्या विकासासाठी ती घ्यावी लागली हा प्रश्न आहे. 

नगरसेवक पदापासून आपल्या काकांना म्हणजे छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांना आव्हान देऊन राजकारणात आपले स्थान निश्चित करणारे उदयनराजे जिकडे सत्ता असते तिकडे जातात, अशी टीका लोकांकडून होताना दिसत आहे. 

सातारा जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. हा जिल्हा स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुढे होता तसाच तो सामाजिक सुधारणांमध्येही अग्रेसर होता. साताऱ्याने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांच्या रुपाने पहिला मुख्यमंत्री आणि देशाला उपपंतप्रधानही दिला. 

बाबासाहेब भोसलेंनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री पदावर साताऱ्याची मोहर उमटवली. अशावेळी ज्या जिल्ह्यात सहकार रुजलेले आहे, जेथे नैसर्गिक वारसा, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, अशा जिल्ह्याचे नेतृत्व एक खासदार म्हणून उदयनराजे यांनी किती प्रभावशालीपणे केले? ज्या पक्षाला बालेकिल्ला म्हणून जनतेने कायम साथ दिली, त्या राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्याला नक्की काय दिले, हे प्रश्न ज्यांनी सत्तेची खुर्ची अनेक दशके उपभोगली त्यांना विचारणे गरजेचे आहे.

पक्षीय आणि संसदीय राजकारणात नेहमी आपल्या पक्षाशी विसंगती आणि लोकसभेमध्ये अल्प उपस्थिती यामुळेच की काय २०१९ च्या निवडणुकीत राजेंच्या मतांमध्ये घट झाली. आपल्या विशेष शैलीमुळे युवकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या उदयनराजेंनी किंवा या जिल्ह्यावर कायम आपली सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने येथील युवकांसाठी काय प्रयत्न केले, असा प्रश्न जनता विचारताना दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सध्याचे राजकारण

उदयनराजेंनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा तो दिल्लीमध्ये करण्याचे ही अनेक संदर्भ बघणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात जातीय राजकारण उघडपणे तितकेसे चालत नसले तरी प्रत्येक राजकीय पक्ष हा जातीय संदर्भ बघून नेत्यांना प्रवेश आणि तिकीट देताना दिसून येतो. याचा दुसऱ्या अर्थाने विचार करताना सर्व जातींना आम्ही संधी देतो आहोत, हादेखील प्रचाराचा भाग असतो. राज्यात बहुजन समजल्या जाणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदे देऊन त्या त्या समाजाची मते आपल्याकडे ठेवणे हे तसे महाराष्ट्राला काही नवे नाही. 

महाराष्ट्रात जेव्हा लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले तेव्हा मराठा समाजाचे नेतृत्व आपण करावे अशी अनेक संघटनानी उदयनराजेंना विनंती केली. मात्र, आपण फक्त एका समाजाचे प्रतिनिधित्व करणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना दिलेले उत्तर जनतेला त्यावेळी नक्कीच रुचले असणार.

परंतू, महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय, पुढे या मोठ्या समाजाला मिळणारे प्रतिनिधित्व आणि त्या त्या समाजाचा जनताप्रिय चेहरा आपल्याकडे घेण्याची भाजपाची नवी राजकीय खेळी विरोधकांना समजत नसेल(?) असे काही नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना आपल्या पक्षात घेऊन देशभरात एक नवी प्रतिमा पुढे करण्याची खेळी आणि तिला मिळणारे यश यावरून राजकीय पटलावर कसे डाव टाकले जातात याचा अंदाज येतो. जातीय राजकारण, पक्ष भूमिका आणि जिल्ह्यात निर्माण झालेली राजकीय संस्थाने यामुळे विकासाच्या बाबतीत जिल्हा कायम मागे राहिला हे अधोरेखित करण्यासारखे आहे. 

वंशज म्हणून पाठीमागे उभी राहिलेली जनता दिसून येते. परंतू, जनतेचाही विचार राज्यकर्त्यांनी करणे या घडीला गरजेचे आहे. कारण, जनतेला सर्व काही समजत असते. 

उदयनराजेंची युवकांमध्ये धडाकेबाज अशी प्रतिमा असताना या जिल्ह्याच्या तरुणाला रोजगारासाठी इतर जिल्ह्यात जावे लागत आहे, याचा विचार येथील मतदारांनी भावनिक मताच्या बाजूला जाऊन कधी केला नाही. छत्रपतींचे वंशज म्हणून जनता कायम सातारा गादीवर प्रेम करताना दिसून येते. दोन्ही राजेंना येत्या काळात याचा फायदा कितपत मिळतो हे बघण्यासारखे आहे.

भाजप, उदयनराजे आणि साताऱ्याचा विकास

पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेले सातारा हे शहर. साताऱ्याहून पुढे कोल्हापूर काहीशा तेवढ्याच अंतरावर. पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये अविकसित राहिलेले सातारा. याला कुठेतरी जिल्ह्याला मिळालेले नेतृत्व कमी पडले का? 

तर नाही. या जिल्ह्याने कायम राज्याचे नेतृत्व केले. पण जिल्ह्यासाठी काही निर्णय घेण्यामागे राज्यकर्ते नक्कीच कमी पडलेले दिसून आले. आज विकासासाठी उदयनराजेंनी पक्ष प्रवेश केला असेल तर त्यांच्यापुढे सातारा शहर महानगरपालिका करणे तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर यांच्यामध्ये औद्योगिक साखळी निर्माण करणे, उद्योग निर्माण करणे असे महत्वाचे मुद्दे आहेत. 

युवकांच्या पुणे शहरात जाण्यामागे येथे न झालेला विकास हाच महत्वपूर्ण मुद्दा आहे. जोपर्यंत सातारा-पुणे द्रुतगती रेल्वेमार्गासारखे निर्णय होत नाहीत, तोपर्यंत येथून स्थलांतरीत होणारा आकडा वाढत जाणार हे नक्की. 

देशात असे निर्णय घ्यायचे असतील तर जनतेला जनतेचे प्रश्न संसदेत घेऊन जाणारा खासदार असावा लागतो. मागील काही काळात असा खासदार जनतेला मिळाला नाही हे जनतेचे दुर्दैव.

उदयनराजे भाजपमध्ये जाण्याचा अर्थ

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा जिल्हा भाजपला मिळवायचा असेल तर हा जिल्हा सत्तेच्या केंद्राभोवती आणणे आवश्यक आहे, हे भाजप नेतृत्वाने ओळखले आहे. म्हणून सत्तेमध्ये वाट देऊन भाजप साताऱ्याच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. यामागे जरी त्यांचा राजकीय फायदा असला तरी याचा फायदा जिल्ह्याला नक्की मिळेल हे नाकरता येणार नाही.

सत्तेच्या बाजूने उभे राहिलेल्या उदयनराजेंना २०१९ च्या निवडणुकीत मिळालेली मते लोकांचा त्यांच्याविषयी असलेला रोष नक्कीच दाखवतात. परंतू ही निवडणूक का लादली याचे उत्तर उदयनराजेंना जनतेला द्यावे लागेल? नाहीतर जनतेने पुन्हा संधी दिल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांना ठोस पावले उचलावे उचलावी लागतील. 

राजकीय पक्षांना न जुमानता आपल्या कार्याच्या विशेष शैलीने जनतेत लोकप्रिय राहून, जनतेला मत देण्यासाठी आकर्षित करणे हा काळ आता मागे पडलेला दिसून येईल. कारण, येथील युवक त्याला आवड म्हणून पुण्यात येत नाही तर येथील राज्यकर्ता वर्गाच्या अपयशामुळे येतो. म्हणून ही लादलेली निवडणूक राजेंना कशी जिंकता येईल हे बघण्यासारखे असेल. 

(हा लेख ह्या आधी The Tilak Chronicle मध्ये प्रसिद्ध झाला होता.)

स्वप्निल करळे

स्वप्निल नंदकुमार करळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

Disclaimer

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते Lokmaanya च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

What do you think? Let us know!